Pooja Pandey Arrest: अलीगडमध्ये एका २४ वर्षीय व्यावसायिकाची सार्वजनिक बसमध्ये चढत असताना गोळ्या घालून हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी पोलिसांनी पूजा पांडेला अटक केली आहे. आठवड्याभरापूर्वी या प्रकरणात अखिल भारत हिंदू महासभेचा प्रवक्ता आणि पूजाचा पती अशोक पांडेला अटक झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाला शुक्रवारी सायंकाळी जयपूर-आग्रा महामार्गावरून अटक करण्यात आली. पूजा आणि तिच्या पतीने मोहम्मद फजल आणि मोहम्मद आसीफ यांना व्यावसायिक अभिषेक गुप्ताची हत्या करण्याचे काम दिले होते. यासाठी दोघांना तीन लाखांची सुपारी देण्यात आली. पोलिसांनी अशोक पांडे आणि दोन्ही मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर आठवडाभरातच पूजा पांडेलाही ताब्यात घेतले आहे.
अलीगडचे पोलीस अधीक्षक नीरज कुमार जदौन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, पूजाला शुक्रवारी भरतपूर येथे रात्री उशीरा अटक करण्यात आली. अभिषेकच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार पूजाने अनेक वर्ष अभिषेक गुप्ताचे लैंगिक शोषण केले. याला कंटाळून अभिषेकने तिच्याशी असलेले संबंध तोडल्यामुळे तिने त्याला मारण्याचा कट रचला.
२०१९ साली महात्मा गांधींच्या पुतळ्यावर झाडली होती गोळी
निरंजनी आखाड्याची महामंडलेश्वर राहिलेसी पूजा पांडे २०१९ साली वादात अडकली होती. त्यावेळी ती अखिल भारतीय हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव होती. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त तिने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणात तिला अटकही करण्यात आली होती.
एका व्हायरल व्हिडीओनुसार, पूजा पांडेने एअर पिस्तूलने महात्मा गांधींच्या पुतळ्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि नंतर पुतळा जाळून टाकल्याचे दिसले होते.