कोलकाता : हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मातबर आणि लोकप्रिय गायक उस्ताद राशिद खान यांचे मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास प्रोस्टेट कर्करोगाने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. डिसेंबरमध्ये प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले, पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही, असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
when siddharth chopra broke up with ishita kumar
पहिला साखरपुडा मोडल्यावर पाच वर्षांनी प्रियांका चोप्राच्या भावाने नीलमशी केला रोका, कोण होती ‘ती’?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

हेही वाचा >>>मियाँ तानसेनच्या घराण्याचा वारसदार; विलंबित ख्याल गायकीवर प्रभुत्व

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राशिद खान यांचे पार्थिव बुधवारी अंत्यदर्शनासाठी रवींद्र सदन येथे ठेवले जाईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांना २१ बंदुकांची सलामी दिली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

प्रख्यात हिंदूुस्तानी शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. त्यांनी शास्त्रीय संगीताचा उज्ज्वल वारसा आपल्यासाठी मागे ठेवला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती मी सहवेदना व्यक्त करते. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

एक गुणी आणि परिपूर्ण कलाकार असेच उस्ताद राशिद खान यांचे समर्पक वर्णन करणे योग्य ठरेल. स्वर, लय, ताल याने नटलेले आणि तान, आलाप, सरगम याचा सुंदर मिलाफ असलेले त्यांचे गाणे स्वच्छ होते. ख्याल, ठुमरी, दादरा असे संगीतातील प्रकार असोत किंवा गज़्‍ाल आणि चित्रपट संगीत, असे सर्वागाने त्यांचे गायन रसिकांच्या मनाला भावले. त्यांनी गायलेले चित्रपट गीत ऐकताना हा शास्त्रीय संगीत गाणारा कलाकार हे गात आहे, यावर विश्वास बसत नाही, इतके सुंदर त्यांचे गायन असायचे. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीताचे नुकसान झाले आहे.- डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका

हेही वाचा >>>सांस्कृतिक पुनर्जागरणाचे ‘नव’वर्ष!

उस्ताद राशिद खान यांचे जाणे ही धक्कादायक आणि दु:खद अशी ही बातमी आहे. मी कायम त्यांच्याकडे एक आदर्श गायक म्हणून पाहायचो. आम्ही एकत्र गाणार होतो, पण दुर्दैवाने ते झाले नाही. – राहुल देशपांडे, प्रसिद्ध गायक

लहान भावासारखे असलेल्या राशिदभाई यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याची भावना दाटून आली आहे. रागसंगीताला गोवर्धन गिरिधारीप्रमाणे उचलून धरणारा मोठा खांब कोसळला असून, त्यांचे निधन झाले हेच संगीत विश्वाला पचवायला काही कालावधी जावा लागेल. मग त्यांच्या गाण्याविषयी बोलणे योग्य ठरेल.- आरती अंकलीकर-टिकेकर, प्रसिद्ध गायिका

पं. भीमसेन जोशी यांनी १९८७ मध्ये २१ वर्षांच्या युवकाला सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये गायन सेवेची संधी दिली होती. किडकिडीत प्रकृतीच्या राशिद खान यांनी आपल्या बुलंद आणि गोड गायनाने रसिकांना प्रभावित केले होते. ते बाबांचे (पं. भीमसेन जोशी) यांचे भक्त होते. आमच्या घरी बाबांसमोर त्यांचे दोनवेळा गायन झाले होते. माझी आणि त्यांची चांगली मैत्री होती. शास्त्रीय संगीताची परंपरा जपून त्यामध्ये आपल्या उत्तम सौंदर्यदृष्टीने भर घालणारा कलाकार असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. गेल्या वर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील त्यांचे गायन अखेरचे ठरेल, असे वाटले नव्हते.- श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ

गेल्या दोन महिन्यांपासून उस्ताद राशिद खान कर्करोगाशी झगडत होते. आमचे ऋणानुबंध वेगळे होते. ते मला लहान भावासारखे होते. त्यांचा पन्नासावा आणि माझा साठावा वाढदिवस आम्ही एकत्र साजरा केला होता. आमच्या पिढीचा प्रतिभावंत गायक होता. षड्ज लावल्यापासून ते स्वरांच्या वेगळय़ा दुनियेत रसिकांना घेऊन जात. पं. भीमसेन जोशी यांनी त्यांच्यावर खूप प्रेम केले. त्यांचे आकस्मिक जाणे चटका लावून जाणारे असले तरी संगीताच्या माध्यमातून ते कायम हृदयात राहतील.- पं. अतुलकुमार उपाध्ये, प्रसिद्ध व्हायोलिनवादक

उस्ताद राशिद खान यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीत क्षेत्रात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली असे म्हणावे लागेल. मुंबईत १९७७ मध्ये त्यांची मैफल ऐकली होती. त्यांच्या गायकीतून नेहमी रागाचे समग्र दर्शन व्हायचे. त्याचबरोबर ठुमरी, दादरा टप्पा देखील ते उत्तम प्रकारे सादर करायचे. तसेच लोकप्रिय गायक म्हणून त्यांनी कमी वयातच मान्यता मिळवली होती. संगीत शास्त्रशुद्ध राखतानाच ते आर्कषक करण्याची कला राशिद खान यांच्याकडे होती जे सहसा कोणाला जमत नाही.- सतीश व्यास, ज्येष्ठ संतूर वादक

ही संपूर्ण देशाची आणि संगीत क्षेत्राची मोठी हानी आहे. राशिद खान आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही, मला अत्यंत वेदना होत आहेत. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल