नवी दिल्ली : राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘रमी’ प्रकरणामुळे वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खातेपालट केले जाणार असून शिवसेनेच्या शिंदे गटाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर काही मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असा दावा खात्रीलायक सूत्रांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चांना बळ मिळाले.
सुमारे दोन महिन्यांनंतर दिल्लीत आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजधानीत सलग दोन दिवस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. हा दौरा पूर्णपणे राज्याच्या विकासप्रकल्प मार्गी लावण्यासाठी होता, असे फडणवीस यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांना सांगितले असले तरी, संसदेतील कक्षामध्ये अमित शहा यांची फडणवीस यांनी २५ मिनिटे चर्चा केली. त्याआधी फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली. राज्यातील मंत्री सातत्याने वादग्रस्त होत असल्याने मंत्रिमंडळाची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात तातडीने फेरबदल करण्याची गरज मुख्यमंत्र्यांना भासू लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन तीव्र केले असून पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन कोकाटेंच्या हकालपट्टीसाठी फडणवीस यांच्यावर दबाव वाढवला आहे. त्यातच, फडणवीस यांनी कृषी मंत्रालयात जाऊन शिवराजसिंह यांच्याशीही चर्चा केली. शिंदे गटातील वादग्रस्त मंत्र्यांबाबतही फडणवीस यांनी अमित शहांशी चर्चा केल्याचा दावा सूत्रांनी केला.
कोकाटेंच्या खात्यात बदल
माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे मंत्री असून प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्याशीही गुरुवारी फडणवीस यांनी नवीन महाराष्ट्र सदनामध्ये सुमारे तासभर चर्चा केली. या घडामोडींमुळे कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून हकालपट्टी निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंगळवारपर्यंत कोकाटेंबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. विधानसभेत रमी खेळण्यावरून कोकाटे वादग्रस्त ठरले असले तरी, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यास अजित पवार तयार नसल्याने त्यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती फक्त मुंबईपुरतीच! महापालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असल्याच्या चर्चा होत असल्या तरी, फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट हे महायुतीतील तीनही पक्ष एकत्रित लढतील. ठाणे, पुणे, नागपूर आदी महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिकेमध्ये शिंदे गटाने एकत्र लढण्याची मागणी भाजपकडे केली आहे. मात्र, ठाण्यातील भाजपचे स्थानिक नेते या युतीला तयार नसल्याचे कळते. शिवाय, पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिकांमध्ये अजित पवार गटाचे प्राबल्य असून त्यांच्या उमेदवारांचीही संख्या जास्त आहे. हीच स्थिती नागपूरमध्ये भाजपला लागू पडते.