राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भीती 

युद्धाची नवी सीमा नागरी समाज असून त्याचा वापर करून देशहिताला धोका पोहोचवला जाऊ शकतो, अशी भीती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) प्रशिक्षणार्थींच्या ७३व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात डोभाल बोलत होते. हा कार्यक्रम हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत (एसव्हीपीएनपीए) झाला. 

डोभाल म्हणाले, ‘‘युद्धजन्य कारवायांची नवी आघाडी नागरी समाज हा आहे. सध्या राजकीय किंवा लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी युद्धे प्रभावी साधन बनली आहेत. परंतु ती खूप महागडी असतात किंवा परवडणारी नसतात. शिवाय, त्यांच्या निर्णयाबाबतही अनिश्चितता असते. परंतु आता एखाद्या राष्ट्राच्या हिताला धोका पोहोचवण्यासाठी नागरी समाज उद्ध्वस्त केला जाऊ शकतो, त्यात फूट पाडली जाऊ शकते किंवा त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.’’

एखाद्या देशाची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था कोलमडली तर तो देश महान बनू शकत नाही. लोक सुरक्षित नसतील तर ते प्रगती करू शकत नाहीत आणि स्वाभाविकपणे देशही कधी पुढे जाऊ शकत नाही, असेही डोभाल यांनी  नमूद केले. 

‘आयीपीएस’ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना डोभाल म्हणाले, केवळ देश उभारणीच्या दृष्टिकोनातूनच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही लोकसेवा हीच सर्वांत मोठी सेवा आहे. नव्या पोलीस अधिकाऱ्यांना भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याबरोबरच केवळ सुधारणांचा विचार न करता भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि त्यांवर आधीच उपाय शोधण्यासाठी परिवर्तनशील बनण्याचे आवाहनही डोभाल यांनी केले.

लोकशाहीचे मर्म मतपेटीत नाही, तर निवडणूक प्रक्रियेतून निवडलेल्या लोकांनी बनवलेल्या कायद्यांमध्ये असते, असे डोभाल म्हणाले. जेथे कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, तेथे राष्ट्रउभारणीत बाधा येते. तसेच ज्या देशात कायदा राबवणारे कमकुवत, भ्रष्ट आणि पक्षपाती असतात तेथील नागरिकांना सुरक्षित वाटत नाही, असेही डोभाल यांनी स्पष्ट केले. 

 पोलिसांचे कौतुक

पोलीस केवळ देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्यच बजावत नाहीत, तर ते १५ हजार किलोमीटरहून अधिक सीमेवर देखरेख आणि तेथील वेगवेगळ्या कामांचे व्यवस्थापन करण्याचे कर्तव्यही बजावतात, अशा शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल यांनी पोलिसांचे कौतुक केले. भारताचे हे सीमाक्षेत्र पाकिस्तान, चीन, म्यानमार आणि बांग्लादेशाशी संलग्न असल्याचेही त्यांनी सांगितले.  

ज्या देशात कायदा राबवणारे, कमकुवत, भ्रष्ट आणि पक्षपाती असतात तेथील नागरिकांना सुरक्षित वाटत नाही.- अजित डोभाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार