Ather Pothole Alert Technology: सोशल मीडियामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांबद्दल सरकारला थेट जाब विचारता येऊ लागला आहे. लोक आज मोठ्या प्रमाणात त्यांना भेडसावणाऱ्या समस्या पदावर असलेल्या नेत्यांच्या, सरकारच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहेत. अशात बंगळुरूतील एका गुंतवणूकदाराने एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये त्याने एथर या इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीने त्यांच्या नव्या मॉडेल्समध्ये दिलेल्या ‘पाथहोल अलर्ट’ (रस्त्यावरील खड्डे) सुविधेवर भाष्य केले आहे. याचबरोबर या व्यक्तीने कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना टॅग करत, “रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करणार का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या व्यक्तीने पोस्टच्या सुरुवातीला कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना टॅग करत लिहिले की, “प्रिय डी. के. शिवकुमार, एथरने एक तंत्रज्ञान विकसित केले आहे जे शहरातील सर्व खड्डे दाखवते. मला माहित नाही की ही अभिमानाची गोष्ट आहे की निराशेची, कारण सरकारने खड्डेमुक्त रस्ते देण्याऐवजी दुचाकी कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना चांगले मार्ग पर्यायी मार्ग सूचवावे लागत आहेत. अशा समस्या सोडवण्यात आपण अनेक दशके मागे गेलो आहोत असे वाटते. म्हणजे सरकारने आपल्याला निराश केले आहे.”
“एथर अॅपवर (लाल रंगात) दाखवलेला बंगळुरूतील प्रत्येक खड्डा पुढील एका महिन्यात बुजवण्याचे काम आपण आव्हान म्हणून घेऊ शकतो का?”, असा सवालही या व्यक्तीने उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.
याचबरोबर या व्यक्तीने पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत म्हटले आहे की, “पुणे, दिल्ली आणि इतर शहरांमध्येही अशीच आव्हाने आहेत.”
“खड्डेमुक्त भारत होईपर्यंत आवाज उठवण्यासाठी मला माझ्या प्रेक्षकांकडून मदत हवी आहे. याचा जास्तीत जास्त परिणाम व्हावा यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करून रिपोस्ट करा. एथरने खड्ड्यांची ठिकाणे दाखवली आहेत, सरकारने फक्त ती दुरुस्त करायची आहेत”, असे या व्यक्तीने पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.