बिहारमधील जनता दल (संयुक्त)च्या विधिमंडळ सदस्यांनी नितीशकुमार यांची नेतेपदी निवड केली असली, तरी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी अद्याप राजीनामा न दिल्यामुळे बिहारमध्ये टोकाचा सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. नितीशकुमार यांना आपला पाठिंबा असून जनता दल(यू) सदस्यांनी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, माकप आणि एका अपक्ष आमदाराच्याही पाठिंब्याचे पत्र राजभवनाला दिले, तर विधानसभेच्या अध्यक्षांनीही कुमार यांच्या निवडीला मान्यता दिली आहे. शनिवारी नितीश समर्थक २० मंत्र्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारण्यात आले असून, नितीशकुमार यांच्या सत्तालालसेमुळेच हा पेच उभा राहिल्याचे भाजपने म्हटले आहे. राज्यपाल सोमवारी पाटण्यात आल्यानंतर हा तिढा सुटेल.
नितीशकुमार यांना ‘होयबा’मुख्यमंत्री हवा
अग्रलेख: बिहारी बनवे
२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत जनता दलाचे १११, भाजपचे ८७, राजदचे २४, काँग्रेसचे ५ व अपक्ष ५ आमदार असून, १० जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री मांझी हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. बहुतांश आमदारांचा मांझी यांना पाठिंबा राहिलेला नसल्यामुळे त्यांना दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहण्याचा काहीही हक्क नव्हता, असे पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यागी म्हणाले.
*जनता दल(यू) व त्याच्या मित्रपक्षांच्या शिष्टमंडळाचा नितीशकुमार यांना १३० आमदारांचा पाठिंबा
असल्याचा रविवारी दावा
*जितन राम मांझी हे आता जद(यू)च्या विधिमंडळ पक्षाचे नेते राहिलेले नाहीत, असे पक्षाध्यक्ष शरद यादव यांचे पत्र
*राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे सोमवारी पाटण्यात
*शरद यादव आणि नितीशकुमार वैयक्तिकरीत्या राज्यपालांना भेटून सरकार स्थापण्याचा दावा करणार
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जितन राम मांझी यांनी भेट घेतली
*केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद व उपेंद्र कुशवाहा यांची बिहारमध्ये नव्याने निवडणुकांची मागणी
लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न जर भाजपने केला तर ते त्यांना महागात पडेल. बिहार विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला जाईल. बहुमत आमच्याबरोबर आहे.
– नितीशकुमार
एक दलित व्यक्ती ‘रबर स्टँप मुख्यमंत्री’ म्हणून काम करेल, असे नितीशकुमार यांना वाटले. मी जेव्हा आत्मसन्मानाने काम करू लागलो, तेव्हापासून त्यांना माझा त्रास होऊ लागला.
जितन राम मांझी, मुख्यमंत्री