नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीतील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या नियुक्तींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी काळातील नेतृत्वाचे स्पष्ट संकेत पवारांनी दिले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्षांत पहिल्यांदाच पक्षाने कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.  खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाव्यतिरिक्त महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय, अत्यंत  महत्त्वाच्या केंद्रीय निवडणूक अधिकार समितीचे अध्यक्षपदीही सुळेंची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे यांच्यावर राज्याची जबाबदारी

खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सांभाळली होती. त्या कधीही पक्षाच्या राज्यातील राजकारणात व निर्णयप्रक्रियेत सहभागी झालेल्या नव्हत्या. दिल्लीची जबाबदारी सुळेंची तर, अजित पवार यांच्याकडे राज्यातील पक्षाचे कामकाज अशी अघोषित विभागणी झाली होती. मात्र, नव्या बदलात सुळे यांच्याकडे पवारांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घालण्याची मुभा दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय निवडणूक समितीही सुळेंच्या ताब्यात दिल्यामुळे निवडणुकीत उमेदवार निवडीचेही सर्वाधिकार सुळे यांना मिळाले आहेत.नाटय़पूर्ण घडामोडीत शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कार्यकर्त्यांच्या आवाहनानंतर पवारांनी राजीनामा मागे घेतला असला तरी, पक्षांतर्गत बदलाचे संकेत दिले होते. सुळे व पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केल्यामुळे पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याऐवजी या दोन्ही नेत्यांकडे देण्यात आली आहे.

नियुक्त्या

  • सुप्रिया सुळे : कार्यकारी अध्यक्ष. महाराष्ट्र, हरियाणा व पंजाबची जबाबदारी. तसेच, केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्षपद. महिला-युवक आणि लोकसभेतील पक्षाचे कामकाज.
  • प्रफुल पटेल : कार्यकारी अध्यक्ष. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी. तसेच, राज्यसभेतील पक्षाचे कामकाज. आर्थिक घडामोडी.
  • सुनील तटकरे : राष्ट्रीय महासचिव. ओदिशा, प. बंगालची जबाबदारी. राष्ट्रीय स्तरावरील समितींच्या बैठका, संसद अधिवेशन, निवडणूक आयोग, अल्पसंख्याक विषयक मुद्दे.
  • जितेंद्र आव्हाड : बिहार, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, कर्नाटकची जबाबदारी. कामगार कल्याण.
  • योगानंद शास्त्री : राष्ट्रीय समिती सेवा दल व दिल्ली प्रदेशाध्यक्ष.
  • के. के शर्मा : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचलची जबाबदारी.
  • मोहम्मद फैजल : तामिळनाडू, पुडुचेरी, तेलंगणा, केरळची जबाबदारी.
  • नरेंद्र वर्मा : ईशान्येकडील राज्ये.

एकजुटीसाठी प्रयत्न

१९७७ मध्ये  विरोधी पक्षांनी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती व सत्ता मिळवली होती. आताही भाजपेतर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी २३ जून रोजी पाटण्यामध्ये  बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम तयार करून आम्ही सगळे नेते देशाव्यापी दौरा करणार आहोत, असे पवार भाषणात म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel supriya sule executive chairman announcement at nationalist congress party ysh
First published on: 11-06-2023 at 00:04 IST