देशाचे माजी राष्ट्रपाती, काँग्रेसचे नेते दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीमधील कथित मद्य धोरण घोटाळ्यामध्ये ईडीने केजरीवाल यांना काल रात्री (दि. २१ मार्च) ताब्यात घेतलं. त्यानंतर देशभरातील विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सध्या काँग्रेससह इंडिया आघाडीत आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनीही या अटकेचा निषेध केला. मात्र शर्मिष्ठा मुखर्जी यांनी या अटकेचं समर्थन केलं असून केजरीवाल यांच्या कर्माची फळं ते भोगत आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून आपले मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, “केजरीवाल यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत नेत्या शीला दीक्षित आणि काँग्रेसवर बिनबुडाचे, बेजबाबदार आणि कठोर आरोप आरोप केले होते. त्यामुळं त्यांच्याच कर्माची फळं ते भोगत आहेत.”

“ते आणि अण्णा हजारे गँगने काँग्रेस पक्ष आणि शील दीक्षित यांच्यावर बेजबाबदार, बिनबुडाचे आणि टोकाचे आरोप केले होते. ते म्हणाले होते की, शीला दीक्षित यांच्या विरोधात त्यांच्याकडे पेटीभरून पुरावे आहेत. पण आजपर्यंत त्या पुराव्यांची पेटी आम्हाला दिसली नाही”, अशी टीका शर्मिष्ठा यांनी केली.

दरम्यान काँग्रेस पक्षाने मात्र आम आदमी पक्षाला याबाबत आपला पाठिंबा देऊ केला आहे. केजरीवाल यांची अटक झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी, देशभरातील काँग्रेसचे नेते आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी एक्सवर आपली नाराजी प्रकट केली. आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याच्या भीतीमधूनच भाजपाकडून ही कारवाई केली जात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. विरोधकांसमोर हरएक प्रकारची समस्या उभी करण्याचे कारस्थान सत्ताधारी रचत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला.