देशातील निवडणुक रणनितीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी आज दिल्लीत सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. तब्बल चार तासांच्या या बैठकीनंतर प्रशांत किशोर हे आता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
या बैठकीत प्रशांत किशोर यांनी २०२४ ची लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवत प्रदीर्घ असं सादरीकरण केलं. यामध्ये काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती, काँग्रेसपुढील आव्हाने, २०२४ ती रणनिती याबाबत मुद्दे मांडले. या बैठकीनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते के सी वेणुगोपाल म्हणाले ” प्रशांत किशोर यांनी जे सादरीकरण केलं आहे त्यावर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर पुन्हा चर्चा केली. एक गट तयार केला जाणार आहे. हा गट प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा आढावा घेईल आणि त्यानंतर एक अहवाल सोनिया गांधी यांच्याकडे एका आठवड्यात सादर करणार आहे”. प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का या प्रश्नावर लवकरच आठवडाभरातच काय ते समजेल अशी प्रतिक्रिया वेणुगोपाल यांनी दिली.
एका माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशाबाबत कोणतीही अट ठेवलेली नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांबाबत जरी सादरीकरण झालं असलं तरी पुढील काही महिन्यात गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. तेव्हा या दोन राज्यांच्या निवडणुकींचा अजेंड्यावर काँग्रेस ही तात्काळ प्रशांत किशोर यांच्याबरोबर कामाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.