Prashant Kishor On Bihar Election Results Politics : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने २०२ जागा जिंकत मोठं यश मिळवलं, तर महाआघाडीला फक्त ३५ जागा जिंकता आल्या. मात्र, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. खरं तर बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाची मोठी चर्चा होती. मात्र, तरीही जनसुराज पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही.
निवडणुकीच्या आधी प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्याबाबत अनेक मोठे दावे केले होते. नितीश कुमार यांच्या पक्षाला २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आपण राजकारण सोडणार असल्याचं प्रशांत किशोर बोलले होते. त्यामुळे आता खरोखर प्रशांत किशोर राजकारण सोडणार का? यावरून चर्चा सुरू आहेत. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी त्यांचा दावा फोल ठरल्यानंतर आता प्रतिक्रिया देत नवी अट ठेवली आहे.
प्रशांत किशोर राजकारण सोडणार?
“काही लोकांचा प्रश्न आहे की नितीश कुमार यांच्या पक्षाला २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. त्याबाबत मी एक दावा केला होता. आता मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा सांगतो की मी ज्या २५ जागांबाबत बोललो होतो, त्या माझ्या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे. जर नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारने १.५ कोटी महिलांना वचन दिलेले २ लाख रुपये वाटले आणि ते मतं खरेदी करून जिंकले नाहीत हे जर त्यांनी सिद्ध केलं तर मी कोणत्याही अटींशिवाय राजकारण सोडेन. जर नितीश कुमार यांच्या सरकारने प्रत्येक महिलेला १०,००० रुपये दिले नसते तर जदयू पक्ष २५ पेक्षा जास्त जागा जिंकू शकला नसता”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
‘मागे हटण्याचा प्रश्नच नाही’
“गेल्या तीन वर्षांत तुम्ही मला काम करताना पाहिलं आहे. त्यापेक्षा दुप्पट मेहनत करेन आणि माझी सर्व शक्ती पणाला लावेन. मागे हटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बिहारला चांगलं बनवण्याचा माझा संकल्प पूर्ण होईपर्यंत मागे हटण्याचा काहीही प्रश्न उद्भवत नाही”, असंही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं.
‘पराभवाबाबत आत्मचिंतन करणार’
“आम्ही या पराभवाबाबत नक्कीच आत्मचिंतन करणार आहोत. ज्या चुका झाल्या असतील त्या नक्कीच सुधारल्या जातील. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या जोमाने आम्ही उभा राहू. काही लोक असं समजत आहेत की मी बिहार सोडेन. मात्र, त्यांचा तो भ्रम असेल. माझ्या पक्षाची बिहार सुधारण्याची जी जिद्द आहे त्यापुढे या जीवनात दुसरं काहीही नाही. हे खरं आहे की गेल्या तीन वर्षांत मी खूप मेहनत केली. या तीन वर्षांत मी जेवढी मेहनत केली, त्यापेक्षा दुप्पट मेहनत मी यापुढे करणार आहे”, असं प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
