Tej Pratap Yadav Latest News : राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांची पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. इतकेच नाही तर तेज प्रताप यांना कुटुंबातूनही काढून टाकल्याची घोषणा त्यांनी केली आहे. बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्ये तसेच सार्वजनिक जीवनातील शिष्टाचारापासून विचलित झाल्याचे कारण दिले आहे. लालू यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या या निर्णयानंतर बिहारच्या राजकारणात याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

बिहारमधील वैशाली येथे माध्यमांशी बोलताना जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर म्हणाले की, “लालू यादव कोणाला कुटुंबातून काढतात आणि कोणाला कुटुंबात ठेवतात बिहारशी याचं काय देणं-घेणं? लालू यादव असं म्हणाले आहेत का की यादव समाजातील एखाद्या लायक व्यक्तीला आम्ही नेता बनवू? लालू यादव यांना आजही वाटतं की तेजस्वी यादव हेच बिहारचे नेते बनावेत.”

पुढे बोलताना त्यांनी यादव समाजातून कोणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असे अवाहन देखील लालू प्रसाद यादव यांना केले आहे. ते म्हणाले की, “आम्ही जन सुराजच्या वतीने उघडपणे म्हटलं आहे की, राजदकडून लालू यादव यांनी जाहीर करावं की… जर त्यांना यादवांची काळजी असेल तर यादव समाजातून (तेजस्वी यादव वगळून) कोणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावे, जन सुराज त्यांच्या पाठीशी उभे राहिल. हे करून दाखवा. जातीबद्दल बोलणारे हे नेते जातीचे राजकरण करत नाहीत, हे फक्त त्यांच्या कुटुंब आणि मुलांचे राजकारण करत आहेत. यांना कोणाचीही काळजी नाही.”

लालू प्रसाद यादव काय म्हणालेत?

लालू प्रसाद यादव त्याच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक न्यायासाठी आम्ही करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. मोठा मुलगा ज्या प्रकारचे कृत्य करतो, लोकांशी त्याचे वागणे आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य आणि संस्काराच्या विरोधात आहे. त्याच्या वरील कृत्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर करत आहे. आता पक्ष आणि कुटुंबात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्याला पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपल्या वैयक्तिक जीवनातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यासाठी तो स्वतः सक्षम आहे. त्याच्याशी ज्यांनी संबंध ठेवायचे आहेत, त्यांनी विवेक वापरून निर्णय घ्यावा. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात वावरताना लोकलज्जेचा पुरस्कार केला. कुटुंबातील इतर आज्ञाधारक सदस्यांनीही सार्वजनिक वावरताना याच मूल्याचा स्वीकार केला आणि आचरणातही आणले. धन्यवाद”, असेही लालू प्रसाद यादव पुढे म्हणाले.