लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर पराभव झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपण जनतेच्या भल्यासाठी काम करत राहणार असून 2020 च्या विधानसभा निवडणुकीत 2015 चा विक्रम मोडू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छाही दिल्या.

2020 साली होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचाच विजय होईल, अशी आशा केजरीवाल यांनी व्यक्त केली. यावेळी ज्यांना मत दिले ते दिले. गेल्या निवडणुकीत आपला 54 टक्के मते मिळाली होती. परंतु यावेळी तो 54 टक्क्यांचा विक्रम दिल्लीची जनता तोडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच तळागाळात जाऊन जनतेशी संपर्क साधा आणि 2020 च्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.

ज्यावेळी पक्ष स्थापन झाला होता त्यावेळी काही मूल्य ठरवून दिली होती. आजही सर्वजण त्या मूल्यांशी एकनिष्ठ असून कोणीही त्यापासून विचलित झाले नसल्याचे केजरीवाल म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मते यावेळी मिळतील. तसेच आपच्या कार्यर्त्यांनी आपले तन, मन आणि धन झोकून देऊन निवडणुकीचा प्रचार केला याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत, असेही केजरीवाल यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर केजरीवाल यांनी पहिल्यांदाच आपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला 18.1 टक्के मते मिळाली होती. तर भाजपाला 56.6 टक्के मते मिळाली असून सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. तर विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 66 जागांवर विजय मिळवला होता.