अंबाला : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी हवाई दलाच्या अंबाला येथून तळावरून राफेल लढाऊ विमानातून भरारी घेतली. हा अनुभव अविस्मरणीय आणि अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. हवाई दलाच्या दोन वेगवेगळ्या लढाऊ विमानांतून उड्डाण करणाऱ्या मुर्मू या पहिल्याच राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी त्यांनी आसाममधील तेजपूर येथून सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून उड्डाण केले होते.
● मुर्मू यांनी लढाऊ विमानामध्ये बसण्यासाठीचा जी-सूट परिधान केला होता. सनग्लासेस घातले होते. ग्रुप कॅप्टन अमित गेहानी यांनी विमानाचे सारथ्य केले.
● विमानाने आकाशात बुधवारी सकाळी ११.२७ वाजता उड्डाण केले. विमानातील ही फेरी सुमारे ३० मिनिटे चालली. विमानाने सुमारे दोनशे किलोमीटर अंतर कापले. समुद्रपातळीपासून १५ हजार फुटांपर्यंत विमान गेले होते. तसेच, तासाला सातशे किलोमीटर इतका वेग विमानाने घेतला होता.
