राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजधानीबाहेरच्या पहिल्याच दौऱ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज लेह-लडाखच्या लष्करी तळाला भेट दिली. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पाचही बटालियनची पाहणी केली. पाकिस्तानी हल्लेखोरांपासून देशाचे आणि लडाखच्या जनतेचे रक्षण करणाऱ्या या बटालियनच्या जवानांचे राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्धशतकापासून थोडे जास्त म्हणजे ५४ वर्षांपासून लडाख बटालियन कार्यरत आहे. या काळात या रेजिमेंटच्या ६०५ जणांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लडाख बटालियनने देशसेवेमध्ये दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचा गौरव राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भाषणात केला. प्रारंभी त्यांनी शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सईद, उपमुख्यमंत्री निर्मलकुमार सिंग अणि जम्मू काश्मीरचे इतर मंत्री उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते लेह येथे महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरमध्ये ‘बुध्दा पार्क’चा शिलान्यास करण्यात आला. तसेच राष्ट्रपतींनी यावेळी कर्नल सोनम वांगचुक यांच्यावरील एका माहितीपटाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर माजी सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी राष्ट्रपतींनी १९४८मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘नुब्रा गार्डस’ची पाहणी केली. १९६३ मध्ये या नुब्रा गार्डसचा भारतीय लष्करातील सर्वसाधारण ट्रूप म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर त्याचा २००० सालात पुनर्रचना होऊन इन्फन्ट्री रेजिमेंटमध्ये समावेश करण्यात आला. ‘ऑपरेशन विजय’मध्ये या रेजिमेंटचा महत्वपूर्ण सहभाग होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President kovind visited to ladakh scouts regimental centre and inspected 5 battalions of regiment
First published on: 21-08-2017 at 18:40 IST