राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती ठरले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोविंद यांनी तब्बल ६५.६५ टक्के मते मिळवून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान झाले होते. यावेळी ९९ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. आज सकाळी ११ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीपासूनच अपेक्षेप्रमाणे कोविंद यांनी मोठी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत वाढत गेली आणि विक्रमी मताधिक्क्याने कोविंद यांनी विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपने आगामी राजकारणाच्यादृष्टीने पक्षाचा दलित चेहरा असलेल्या रामनाथ कोविंद यांना जाणीवपूर्वक उमेदवारी दिली होती. याशिवाय, या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यासाठीही भाजपने खूप प्रयत्न केले होते. आजच्या निकालांमुळे भाजपचे हे डावपेच सफल ठरल्याचे दिसून आले. मात्र, राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचण्यापूर्वी रामनाथ कोविंद यांनी अनेक जबाबदाऱ्या पाडल्या आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या सात गोष्टी.

१. रामनाथ कोविंद मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. रामनाथ कोविंद कोळी जातीचे असून उत्तर प्रदेशात या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला जातो.

२. रामनाथ कोविंद यांनी कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतचे शिक्षण घेतले.

३. पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते.

४. रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तीनच वर्षांनी म्हणजेच १९९४ मध्ये कोविंद यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली.

५. रामनाथ कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता.

६. ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.

७. भाजपच्या दलित मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली आहे. यासोबतच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presidential election 2017 7 seven interesting facts about new president of india ramnath kovind
First published on: 20-07-2017 at 17:04 IST