पुण्यामध्ये एका गर्भश्रीमंत बिल्डरच्या मुलानं पोर्श कारने दोन जणांना उडवून त्यांचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत एका चालकानं तिघांना उडवल्याची घटना घडली आहे. या दोन घटनांवर सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असतानाच कर्नाटकमधला एक भयानक व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे. आठवड्यापूर्वी घडलेल्या या भीषण घटनेचा व्हिडीओ कर्नाटक भाजपानं त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपही होऊ लागले आहेत.

काय घडलंय कर्नाटकमध्ये?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १८ मे रोजीच्या मध्यरात्री घडली. कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात हा सगळा प्रकार घडला. कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचं रुपांतर हाणामारीत आणि नंतर या भीषण प्रकारात झाल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. उडपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेचा व्हिडीओ तिथल्याच एका इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीनं शूट केला असून तोच सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. तसेच, गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या तलवारी, सुरे, एक स्विफ्ट कार, दोन दुचाकी आणि इतर शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.

Video मध्ये नेमकं काय?

या व्हिडीओमध्ये दोन गाड्यांमध्ये आलेल्या काही तरुणांचे दोन टोळके एकमेकांवर हल्ले करत असल्याचं दिसत आहे. आधी त्यांनी एकमेकांवर गाड्या चढवल्याचं दिसत आहे. त्यानंतर काही तरुण गाड्यांमधून उतरले आणि त्यांनी हातातली शस्त्रांनिशी दुसऱ्या टोळीच्या गाडीवर, त्यातील तरुणांवर हल्ले करायला सुरुवात केले. यातील एका पांढऱ्या रंगाच्या कारनं तर एका तरुणाला उडवलं. यानंतर हा तरुण रस्त्यावर निपचित पडला होता. त्याला दुसऱ्या टोळीच्या काही तरुणांनी उचलून त्यांच्या गाडीत ठेवलं. मात्र, त्याआधी विरुद्ध टोळीच्या तरुणांनी निपचित पडलेल्या या तरुणावर हातातील शस्त्रानेही वार केले. महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला हा थरार संबंधित प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला आहे.

पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं, तीन वर्षांच्या चिमुरड्याची प्रकृती गंभीर

भाजपाची टीका

या घटनेचा व्हायरल व्हिडीओ कर्नाटक भाजपानं त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला असून त्यासोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला लक्ष्य केलं आहे. “कर्नाटक मॉडेल. गँगवॉर, बलात्कार, हल्ले, हत्या, बॉम्बस्फोट, गांजा, अफू, रेव्ह पार्ट्या, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा हे सगळं कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या काळात सामान्य झालं आहे”, अशी टीका भाजपानं केली आहे.

दरम्यान, ही घटना आठवड्याभरापूर्वी घडली असून त्याचा व्हिडीओ आत्ता व्हायरल होत असल्याचं उडपी पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून दोन जणांना अटक केली आहे, तर इतर शस्त्र जप्त केली आहेत. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.