काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या एका खासदाराची कोलकात्या हत्या झाल्याची बाब उघड झाल्यामुळे खळबळ उडाली. अन्वरुल अझीम असं बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या या खासदाराचं नाव असून ते वैद्यकीय उपचारांसाठी ते कोलकात्याला आले होते. मात्र, त्यांच्याच एका व्यावसायिक भागीदारानं त्याच्या मित्राकरवी अझीम यांची हत्या घडवून आणल्याचं आता समोर येत आहे. या हत्येचा घटनाक्रम आणि पद्धतीचा तपास पोलिसांकडून सध्या चालू असून त्यातून दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. पोलिसांना अजूनही अझीम यांच्या मृतदेहाचे सर्व तुकडे सापडलेले नाहीत.

१३ मे रोजी अन्वरूल अझीम यांची कोलकात्यामधील न्यू टाऊन भागातल्या एका फ्लॅटवर निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणातील काही संशयितांच्या अटकेनंतर हा सगळा प्रकार आता उघड झाला आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत हनीट्रॅपसाठी वापर करण्यात आलेली एक तरुणी आणि तिच्यासह आणखी दोन जणांना अटक केली असून सध्या न्यायालयाने त्यांची १२ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

नेमकं कोलकात्यात घडलं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. अझीम यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मित्र अख्तरुझमन हा या संपूर्ण घटनेचा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांना संशय आहे. अख्तरुझमन हा बांगलादेशी वंशाचा अमेरिकन नागरिक आहे. त्यानं आधी न्यू टाऊन भागात एक फ्लॅट भाड्याने घेतला. त्यानंतर सिलास्ती रेहमान नावाच्या तरुणीला अझीम यांना भुलवण्याचं काम सोपवलं. अख्तरुझमनने दोन महिन्यांपूर्वीच सिलास्तीसह पेशानं खाटिक असणारा मुंबईतील बेकायदा बांगलादेशी रहिवासी जिहाद हवालदार आणि आणखी दोघांना हत्येची सुपारी दिली.

Video : गाडी मागे घेताना चालकाने ७० वर्षीय वृद्धाला दोन वेळा चिरडले, व्हिडीओ व्हायरल

सिलास्ती रेहमाननं आधी अझीम यांच्याशी संपर्क साधून जवळीक वाढवली. भारतात आल्यानंतर भेटीगाठींचं नियोजनही केलं. १२ मे रोजी अझीम भारतात आल्यानंतर आधी ते बडानगर भागातील माँडोलपारा लेनमध्ये सोन्याचा व्यापारी असणारा त्यांचा मित्र गोपाल विश्वासला भेटायला गेले. १३ मे रोजी हत्येच्या प्रकरणात २० वर्षं तुरुंगात काढलेला अमानुल्लाह त्यांना भेटायला आला. त्यानं अझीम यांना न्यू टाऊनमधील फ्लॅटवर नेलं. तिथे सिलास्ती आणि तिचे सहकारी हजर होते.

आधी हत्या, नंतर मृतदेहाचे तुकडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी १३ तारखेला दुपारी अझीम वॉशबेसिनजवळ तोंड धुवत असताना त्यांना क्लोरोफॉर्मचा वापर करून बेशुद्ध केलं. नंतर त्यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांची हत्या केली. यानंतर त्यांच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे केले. जिहाद हवालदारनं त्यांच्या हाडांचेही बारीक तुकडे केले. नंतर हे सर्व तुकडे छोट्या पाकिटांमध्ये भरण्यात आले. ही पाकिटं एका सुटकेसमध्ये आणि ट्रॉली बॅगेत भरण्यात आली. नंतर हे सर्व मारेकरी फ्लॅटपासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कृष्णमती भागात गेले. तिथे वेगवेगळ्या दिशांना जाऊन त्यांनी त्या सर्व पॅकेट्सची विल्हेवाट लावली.

अख्तरुझमन फरार, महिलेसह तिघे अटकेत

दरम्यान, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड अख्तरुझमन हत्या झाल्याच्या दिवसापासून भारतातून पळून गेल्याचं उघड झालं आहे. घटनेनंतर दोन दिवसांनी पश्चिम बंगाल सीआयडीनं जिहाद हवालदारला अटक केलं. मृतदेहाचे तुकडे केल्याची हवालदारनं पोलिसांना कबुली दिली. त्यापाठोपाठ सिलास्ती रेहमान आणि तिच्या दोघा साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांची १२ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अजूनही अझीम यांच्या मृतदेहाचे सर्व भाग पोलिसांना सापडले नसून आरोपींच्या चौकशीतून शोधमोहीम चालू आहे.