नवी दिल्ली : मानवाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अवकाशातील रहस्यांचा शोध घेण्यासाठी, अधिक सखोल, व्यापक संशोधनासाठी अंतराळ शास्त्रज्ञांनी तयारी करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त शनिवारी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात मोदी यांनी सांगितले की, लक्षणीय संख्यने अंतराळवीर तयार करण्यासाठी सरकार योजना आखत आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने त्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
अवकाश क्षेत्रात एकापाठोपाठ एक यश मिळवणे ही आता देशाची आणि शास्त्रज्ञांची नैसर्गिक सवय झाली आहे असे प्रशंसोद्गार पंतप्रधानांनी काढले. ते म्हणाले की, “आपण चंद्रावर आणि मंगळावर पोहोचलो आहोत. आता आपल्याला अथांग अवकाशात जायचे आहे, तिथे मानवाचे भवितव्य उजळवण्यासाठी अनेक रहस्ये आहेत.” कोणतीही आघाडी अखेरची नाही असे एकामागोमाग एक आकाशगंगा, अनंत विश्व आपल्याला सांगते. धोरण पातळीवर अवकाश क्षेत्रालाही हे लागू आहे असे आश्वासन मोदी यांनी शास्त्रज्ञांना दिले.
अवकाश क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी खासगी क्षेत्रानेही पुढे यावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. आपण वर्षाला ५० रॉकेटचे प्रक्षेपण करू शकू अशा मुक्कामाला आपण पोहोचू शकू का, असा प्रश्नही त्यांनी अवकाश शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना विचारला.
तुम्हा शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमामुळे, भारत लवकरच गगनयान मोहीम मोहीम सुरू करणार आहे. तसेच आपण स्वतःचे अवकाश स्थानकही बांधणार आहोत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान