पीटीआय, श्रीनगर

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर मुक्तपणे श्वास घेत असून विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

श्रीनगर येथील बक्षी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर’ या जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर आरोपास्त्र डागले. ते म्हणाले, अनुच्छेद ३७०वरून काँग्रेसने केवळ जम्मू-काश्मीरमधील लोकांचीच नाही, तर संपूर्ण देशाची दीर्घकाळ दिशाभूल केली. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करून त्याची दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी केल्यानंतर मोदी यांनी प्रथमच जम्मू-काश्मीरला भेट दिली. 

हेही वाचा >>>Lok Sabha Polls: काँग्रेसची गॅरंटी; राहुल गांधींनी देशातील युवकांना दिली ‘पाच’ आश्वासनं

सन २०१९मध्ये राज्यघटनेचा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर  आज विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करीत आहे. कारण हे राज्य मुक्तपणे श्वास घेत आहे, असे मोदी यांनी नमूद केले. अनुच्छेद ३७० संपुष्टात आल्यानंतर जम्मू-काश्मीरने आपल्या बेडय़ा तोडल्या आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा मुकुट असल्याचे उद्गार काढून पंतप्रधान म्हणाले,‘‘शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि पर्यटनाच्या संधींमधूनच जम्मू-काश्मीरच्या विकासाचा मार्ग निर्माण होतो.’’

पुलवामाच्या तरुणाची ‘मधुर क्रांती’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात नझीम नाझीर या युवकाचे एक स्वप्न सत्यात साकारले ते म्हणजे पतंप्रधानांबरोबर सेल्फी काढण्याचे. पंतप्रधानांनी केवळ नझीमबरोबर सेल्फीच काढला नाही तर त्याला आपला ‘मित्र’ही संबोधले. पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी असलेला नझीम एक मधुमक्षिका पालन केंद्र चालवतो.

त्याने त्याद्वारे १०० तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर ती प्रसिद्ध करत त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच मधुमक्षिका पालनात ‘मधुर क्रांती’ केली असल्याचेही म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६,४०० कोटींचे प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा हजार ४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान म्हणाले की विकास प्रकल्पांमुळे जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला मोठी चालना मिळेल. जम्मू-काश्मीरचा विकास ही विकसित भारताची प्राथमिकता आहे.