पीटीआय, नवी दिल्ली

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत देश-विदेशातील मान्यवरांकडून पंतप्रधानांना शुभेच्छा देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

यानिमित्ताने ‘चलो जीते है’ हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट देशभरातील लाखो शाळांमध्ये आणि काही चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे. २०१८ मध्ये प्रसारित झालेला हा चित्रपटात स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मोदी यांच्या बालपणावर आधारित आहे. हा चित्रपट सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, चालक आणि समाजाच्या तळागाळातील मूक नायकांचा सन्मान ठरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

मोदी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालयाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘पोलादी पुरूष’ सरदार वल्लभभाई पटेल यांची कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित त्रमितीय संवादात्मक प्रतिकृती ही या संग्रहालयाचे वैशिष्ट आहे. १९४८ मध्ये याच दिवशी सरदार पटेल यांनी स्वायत्त संस्थानांना एकत्र आणत राष्टनिर्माणाचे उद्दीष्ट पूर्ण केले होते.

महारष्ट्रातील महसूल विभागानेही यानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्यभरात विभागातर्फे महसुली सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार असून विविध सेवा प्रकल्पांचा बुधवारी शुभारंभही करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रांतील शहरांमध्ये उभे राहणार ‘नमो उद्यान’

यानिमित्त जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात महापालिकांना ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी एक कोटी रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. या योजनेचा राज्यातील ३९४ महापालिका आणि नगरपालिकांना लाभ होईल. या नमो उद्यान योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि एक कोटी रूपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना म्हणजे महाराष्ट्राकडून पंतप्रधानांना दिलेली वाढदिवसाची भेट आहे, असे सांगितले.

मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथील प्राथमिक शाळेपासून अगदी महाविद्यलयापर्यंत आम्ही दोघे एकाच ठिकाणी शिकलो. ते फावल्या वेळेत रेल्वेस्थानाकावरील वडिलांच्या चहा टपरीवर मदत करायलाही जात असत. आम्ही एकत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही जात होतो. १९६९ मध्ये आम्ही दोघे वडनगर येथील स्थानिक वीरकन्यांच्या स्मारकाजवळून जात असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यावर मी या स्मारकाची दुरूस्ती करेन असे सांगितले. ते या स्वप्नाचा वारंवार उल्लेख करत असत. अखेर तीन दशकांनी अर्थात २००१ मध्ये मुख्यमंत्री पदी विराजमान होत त्यांनी ते स्वप्न साकार केले.- दशरथभाई पटेल, पंतप्रधानांचे बालमित्र