पीटीआय, नवी दिल्ली
एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी केला. येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन-कम-कन्व्हेंशन सेंटरच्या (आयईसीसी) उद्घाटनप्रसंगी मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्याविषयी विश्वास व्यक्त केला. यावेळी आयईसीसीचे नामकरण भारत मंडपम असे करण्यात आले.
प्रगती मैदान भागातील इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे (आयटीपीओ) नूतनीकरण केल्यानंतर बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांनी पूजा केली. त्यानंतर संध्याकाळी त्याचे उद्घाटन करण्यात आले. या नूतनीकरणासाठी साधारण २,७०० कोटी रुपये खर्च आला. उद्घाटनप्रसंगी भाषण करताना मोदी म्हणाले की, ‘२५ वर्षांमध्ये आपल्याला विकसित देश होण्याचे ध्येय गाठायचे आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार देशातील १३.५ कोटी लोकांना दारिद्रय़रेषेबाहेर काढण्यात यश आले आहे’. भारत ही लोकशाहीची जननी असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे असा दावा त्यांनी केला. काही लोक भारताचे विकास प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.
भारत मंडपम येथे सप्टेंबरमध्ये जी-२० शिखर परिषद होणार आहे. त्यावेळी पर्यटनाला चालना दिली जाईल असे ते म्हणाले.
