पीटीआय, बारासात (पश्चिम बंगाल)

पश्चिम बंगालमधील संदेशखालीत झालेल्या अत्याचारविरोधी असंतोषाचे वादळ अवघ्या पश्चिम बंगालमध्ये घोंघावणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यात महिला शक्ती महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बारासात येथे भाजपने आयोजित केलेल्या ‘नारी शक्ती वंदन अभिनंदन’ कार्यक्रमाला मोदी संबोधित करत होते.

मोदी म्हणाले, की संदेशखालीतील महिला शक्तीवर अत्याचाराचे घोर पाप केले गेले आहे. त्यामुळे शरमेने सर्वांचीच मान झुकली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालमधील सरकार उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे धक्के सहन करूनही आपल्या राज्यातील महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना रक्षण देण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च करत आहे. यामुळे पश्चिम बंगालसह अवघ्या देशातील महिला संतापल्या आहेत. महिला शक्तीच्या संतापाची ही लाट केवळ संदेशखलीपुरती मर्यादित राहणार नाही, तर ती संपूर्ण बंगालमध्ये पसरेल आणि संपूर्ण राज्यातून ‘तृणमूल’ला उद्ध्वस्त करेल. तृणमूल काँग्रेस सरकार राज्यातील महिलांच्या सुरक्षेऐवजी लांगूलचालन-तुष्टीकरणाच्या राजकारणाला महत्त्व देत आहे.

हेही वाचा >>>दिल्ली उच्च न्यायालयाने भाजपाच्या सात आमदारांचं निलंबन केलं रद्द, जाणून घ्या काय घडलं होतं?

संदेशखालीतील महिलांच्या बस रोखल्या!

पश्चिम बंगालमधील बारासात येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी संदेशखाली येथून महिलांना घेऊन जाणाऱ्या काही बस पोलिसांनी रोखल्या. अनेक ठिकाणी कथितरित्या सुरक्षेसाठी खबरदारीचे कारण सांगत या बस रोखण्यात आल्या. भाजपच्या प्रदेश शाखेने संदेशखलीच्या महिलांना सुमारे ८० किलोमीटरवर असलेल्या मोदींच्या सभास्थळी नेण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) निलंबित नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या साथीदारांवर संदेशखलीच्या महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका भाजप नेत्याचा आरोप आहे की, सुरक्षेची कारणे सांगत या बस प्रथम न्यू टाऊनमधील विश्व बांगला गेटवर आणि नंतर बारासतच्या मार्गावर विमानतळ प्रवेशद्वार क्रमांक एक येथे थांबवल्या. पोलीस आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत होते.

अत्याचारग्रस्त महिलांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील अत्याचारग्रस्त महिलांच्या एका गटाची भेट घेतली. संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बारासात येथे जाहीर सभेनंतर मोदींनी महिलांची भेट घेतली. भाजपचे पश्चिम बंगालचे सरचिटणीस अग्निमित्रा पॉल यांनी पीटीआयला दूरध्ववनीवरून सांगितले, की मोदी यांच्या जाहीर सभेनंतर ते संदेशखालीच्या काही महिलांना भेटले. यावेळी या महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती मोदींनी दिली. या महिला आपल्यावरील अत्याचारांची माहिती मोदींना सांगताना भावूक झाल्या होत्या. यावेळी मोदींनी संयमी पित्याप्रमाणे त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना संदेशखाली येथील महिलेने सांगितले की, पंतप्रधानांनी आमचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.