पीटीआय, बक्सर/देहरी (बिहार)

इंडिया आघाडी मुस्लीम मतपेढीसाठी मुजरा आणि गुलामी करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. त्याचबरोबर इंडिया आघाडीचा मागासवर्गीयांचे आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बिहारमधील बक्सर, कराकत आणि पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघांत लागोपाठ घेतलेल्या प्रचारसभांत पंतप्रधान म्हणाले, ‘‘इंडिया आघाडी जनतेत भय निर्माण करण्यात मशगूल असून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार मात्र दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी निर्भयपणे काम करत आहेत.’’

‘‘बिहार या भूमीने सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा दिली आहे. त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसींचे अधिकार हिरावून ते मुस्लिमांना देण्याचे इंडिया आघाडीचे मनसुबे उधळून लावण्याचा इशारा मी याच भूमीवरून देतो असे आव्हानही पंतप्रधान मोदी यांनी दिला. ते (काँग्रेस) त्यांच्या मतपेढीला खूश करण्यासाठी गुलामी आणि मुजरा करत राहतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा >>>गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; १६ जणांचा मृत्यू

पंजाब तसेच तेलंगणातील काँग्रेस नेत्यांबरोबरच तमिळनाडूतील द्रमुक आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी बिहारमधील स्थलांतरितांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केल्याने येथील नागरिक दुखावले आहेत, असा आरोपही पंतप्रधानांनी केला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते मात्र कंदील (निवडणूक चिन्ह) घेऊन ‘मुजरा’ करीत आहेत. निषेधाचा एक शब्दही बोलण्याची हिंमत त्यांच्यात नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

‘विरोधकांच्या विचारांत खोट’

‘‘विरोधी आघाडीने असा निर्णय घेतला आहे की जर त्यांना सत्तेवर आणले गेले, तर ते सर्वप्रथम संविधानात बदल करतील, जेणेकरून मागासवर्गीयांचे आरक्षण मुस्लिमांकडे वळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना न्यायालयही रोखू शकणार नाही. माझ्या या दाव्याचे लेखी खंडन करण्याचे आव्हान मी त्यांना दिले आहे, पण ते स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही, कारण त्यांच्या विचारांतच खोट आहे,’’ अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

हेही वाचा >>>“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य

मोदींना ‘म’चे आकर्षण का?

‘इंडिया आघाडी’ गट आपल्या मतपेढीसाठी मुजरा करत असल्याचे विधान पंतप्रधानांनी करणे योग्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार गट) आणि राष्ट्रीय जनता दलाने शनिवारी केला. मोदींना ‘म’ या अक्षराचे आकर्षण का? मुसलमान, मच्छी, मंगलसूत्र आणि मटण यानंतर आता ते ‘मुजरा’वर आले आहेत. पंतप्रधानांना हे शोभते का, असा प्रश्नही दोन्ही पक्षांनी उपस्थित केला आहे.

‘इंडिया आघाडी’ हा गट एका फुग्यासारखा आहे. तो सहाव्या टप्प्याचे मतदान सुरू असताच फुटला आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान