पीटीआय, बंगळूरु
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तेजस विमानातून उड्डाण केले. या अनुभवामुळे देशाच्या स्वदेशी क्षमतेवर विश्वास अधिक दृढ झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. ‘तेजस’चे यशस्वी उड्डाण झाल्याचे ‘एक्स’वर मोदींनी आवर्जून नमूद केले.
मोदींनी नमूद केले की, हा अनुभव अविश्वसनीय होता. यामुळे आपल्या देशाच्या स्वदेशी निर्मितीक्षमतेवरील माझा विश्वास आणखी वृद्धिंगत झाला आहे. आपल्या राष्ट्रीय क्षमतेविषयी माझ्यात आणखी नवा आशावाद आणि अभिमान निर्माण झाला आहे. त्यांनी असेही लिहिले की, आज ‘तेजस’मध्ये उड्डाण केल्यानंतर मी अभिमानाने सांगू शकतो की आमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे आम्ही स्वावलंबी झालो आहोत. या क्षेत्रात जगात आपण कोणाच्याही तुलनेत कमजोर नाही. भारतीय हवाई दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) तसेच सर्व भारतीयांचे याबद्दल हार्दिक अभिनंदन.