पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी ते शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं देत आहेत. यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची थट्टाही केली आहे. तुम्ही ऑनलाईन अभ्यास करता की रिल्स पाहता असा प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाईन अभ्यास करताना लक्ष विचलित होतं, अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केली असता, त्यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं. ते म्हणाले,”माझ्या मनात एक गोष्ट येतेय की, तुम्ही विचार करा की, तुम्ही ऑनलाईन वाचत असता की रिल्स पाहत असता? मी तुम्हाला हात वर करायला लावणार नाही. पण तुम्हाला कळलं की मी तुम्हाला पकडलंय. खरंतर दोष ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा नाही. तुम्ही अनुभव घेतला असेल वर्गातही अनेकदा तुमचं शरीर वर्गात आहे, डोळे शिक्षकांकडे आहेत पण एकही गोष्ट कानात जात नसेल. कारण तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे आहे. ज्या गोष्टी ऑफलाईन होतात, त्याच गोष्टी ऑनलाईन होतात. याचा अर्थ माध्यम ही समस्या नसून मन ही समस्या आहे. माध्यम कोणतंही असून माझं मन जर त्याच्याशी जोडलेलं आहे, त्यात मग्न आहे, तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन काहीही फरक पडतो.

मोदी पुढे म्हणाले, “युग बदलतं तसं माध्यमही बदलतं. पूर्वीच्या काळी गुरुकुल असायचे, तेव्हा पुस्तके नव्हती, काहीच नव्हतं. त्यावेळी फक्त ऐकायचे आणि पाठांतर करायचे. अनेक पिढ्या हे असंच चालू होतं. पुढे काळानंतर पुस्तकं आली, ही उत्क्रांती होतच गेली.आज आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणखी पुढे आलोय, आणखी सोपं झालं आहे. याला आपण एक समस्या न समजता एक संधी समजलं पाहिजे. पण हेही खरं आहे की आपण प्रयत्न करायला हवा की ऑनलाईन अभ्यासाला तुम्ही बक्षीस म्हणून समजायला हवं. तुम्ही जर शिक्षकांनी दिलेल्या नोट्स आणि ऑनलाईन मिळालेल्या नोट्स या दोन्ही वाचल्या तर तुम्ही तुमच्या अभ्यासात आणखी भर घालू शकाल. दोन्ही एकत्र करून अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होईल. शिक्षणाचा एक भाग आहे ज्ञानार्जन करणे. ऑनलाईन मिळवण्यासाठी आहे आणि ऑफलाईन घडण्यासाठी आहे. मला किती ज्ञान मिळवायचं आहे, ते मी जगातल्या कानाकोपऱ्यातून मिळवेन आणि जे मला तिथे मिळालं आहे ते मी ऑफलाईन स्वतःला घडवण्यासाठी वापरेन”.

यावेळी पंतप्रधानांनी एक उदाहरणही दिलं. ते म्हणाले,”तुम्ही ऑनलाईन डोसा तयार कराल, मस्त डोसा तयार कराल पण त्याने पोट भरेल का? पण हेच जर डोसा कसा बनवायचा हे ऑनलाईन पाहिलं आणि प्रत्यक्षात डोसा बनवला तर त्याने पोट भरेल. ज्ञानाचंही असंच आहे. ऑनलाईनचा आधार घेऊन तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे आणि ते ज्ञान तुमच्या जीवनात वापरायचं आहे. पूर्वी ज्ञान मिळवण्याची अगदी मर्यादित साधनं होती, पण आता त्या मर्यादा राहिलेली नाही. त्यामुळे तुम्ही ऑनलाईनला एक संधी समजा, तुम्हाला टूल्सही उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही स्वतःला शिस्त लावू शकता. अनेक मुलं या टूल्सच्या माध्यमातून स्वतःवर काही बंधनं घालून घेतात, ज्यांचा त्यांना फायदा होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi in pariksha pe charcha talk with students vsk
First published on: 01-04-2022 at 12:04 IST