Donald Trump Said PM Narendra Modi Loves Me: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमध्ये नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान लष्करी संघर्ष, नोबेल शांतता पुरस्कार, रशिया-युक्रेन युद्ध यासह भारत-अमेरिका आणि त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांवर भाष्य केले. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर प्रेम करतात, असे अमेरिकेचे भारतातील नवनियुक्त राजदूत सर्जिओ गोर यांनी त्यांना सांगितल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ते माझ्यावर प्रेम करतात
अमेरिकेचे भारतातील नवनियुक्त राजदूत सर्जिओ गोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीबद्दल एएनआयच्या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मला वाटते त्यांच्यातील बैठक उत्तम होती. मोदी एक महान व्यक्ती आहेत. सर्जिओ गोर यांनी मला सांगितले की, ते (पंतप्रधान मोदी) माझ्यावर प्रेम करतात. मी अनेक वर्षांपासून भारताकडे पाहत आहे. भारत एक महान देश आहे. तिथे दरवर्षी तुम्हाला एक नवीन नेता मिळतो. काही जण अवघे काही महिने तिथे राहतात, पण माझे मित्र मोदी हे गेल्या अनेक वर्षांपासून तिथे आहेत. त्यांनी मला शब्द दिला आहे की, ते रशियाकडून तेल खरेदी थांबवतील. हे लगेच होणार नाही, कारण ही प्रक्रिया थोडी किचकट आहे. परंतु ही प्रक्रिया लवकरच संपणार आहे.”
पंतप्रधान मोदींनी शब्द दिला
भारत रशियाकडून करत असलेल्या तेल आयातीबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत. आमचे खूप चांगले संबंध आहेत. भारत तेल खरेदी करत आहे याबाबत मी नाराज आहे. पण, त्यांनी आज मला शब्द दिला आहे की ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. आता आपल्याला चीनलाही हेच करायला लावावे लागेल.”
नोबेल शांतता पुरस्काराची आशा कायम
डोनाल्ड ट्रम्प यांना आशा होती की, त्यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार मिळेल, पण नोबेल पारितोषिक समितीने यंदाचा शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना दिला. याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला वाटत नाही की कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने एकही युद्ध थांबवले असेल. मी आठ महिन्यांत आठ युद्धे थांबवली. मला नोबेल पारितोषिक मिळाले का? नाही. पण मला वाटते की पुढचे वर्ष माझ्यासाठी चांगले असेल.”