पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अन्य नेत्यांनी मंगळवारी दुपारी गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुंडे यांचे पार्थिव दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील ११, अशोक पथ येथील भाजपच्या मुख्यालयात आणण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पुष्पचक्र पाठवून आपली श्रद्धांजली वाहिली.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, बिजू जनता दलाचे जय पांडा यांनीही भाजपच्या कार्यालयात जाऊन मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरूण जेटली, सुषमा स्वराज, वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, रामविलास पासवान, कलराम मिश्रा, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, अनंतकुमार, अनंत गीते, प्रकाश जावडेकर यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पक्ष कार्यालयात जाऊन अंत्यदर्शन घेतले.
मुंडे यांची मुलगी आणि आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्यासह इतर कुटुंबीय यावेळी पक्ष मुख्यालयात उपस्थित होते. मोदी यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे-पालवे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावतीनेही पुष्पचक्र पाठवून श्रद्धांजली वाहण्यात आली.