जयपूर : काँग्रेसमध्ये कोणी खरे बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला संपवले जाते असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील प्रचारसभेत केला. भिलवाडा जिल्ह्यातील कोटरी येथे बोलताना मोदी यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या बंडाचा संदर्भ देत काँग्रेसवर टीका केली.
हेही वाचा >>> “पाकिटमार कधीच एकटा येत नाही..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधीचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
गांधी कुटुंबाचे नाव न घेता मोदी म्हणाले, की ‘‘काँग्रेसमधील कुटुंबासमोर कोणीही काहीही बोलले की तो संपलाच. राजेश पायलट यांनी एकदा काँग्रेसमधील कुटुंबाला आव्हान दिले. पण हे कुटुंब असे आहे की राजेश पायलट यांना शिक्षा दिल्यानंतर ते त्यांच्या मुलालाही शिक्षा देत आहेत’’. राजेश पायलट यांनी १९९७ मध्ये पक्षाध्यक्षपदासाठी सीताराम केसरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्याबद्दल मोदी बोलत होते.
काँग्रेस जनताविरोधी आणि देशविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला. काँग्रेस पक्ष दहशतवादी, दंगेखोर आणि गुन्हेगारांबद्दल सौम्य दृष्टीकोन बाळगते. तसेच भ्रष्टाचार हे या पक्षाचे धोरण आहे. यामुळेच राजस्थान गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर आहे असे मोदी म्हणाले.