काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधल्या सभेत पंतप्रधान मोदींवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांचे दौरे सुरु आहेत. अशात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी सोडत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदाणींना सगळं आंदण कसं दिलं याची उदाहरणं राहुल गांधी कायमच देत असतात. आज झालेल्या भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गौतम अदाणी यांची तुलना पाकिटमारांशी केली आहे.
काय म्हणाले आहेत राहुल गांधी?
“पाकिटमार कधीच एकटा येत नाही, तिघेजण असतात. तिघे येतात, कारण पाकिटमार एकटा समोरुन आला तर तो आपला खिसा कसा कापणार? तिघे येतात, एक समोरुन, एक पाठीमागून आणि एक लांब उभा असतो. समोरचा खिसेकापू तुमचं लक्ष विचलित करतो. तो तुम्हाला सांगेल काहीतरी पडलंय. तुमचं लक्ष विचलित झालं की मागचा खिसेकापू तुमचा खिसा कापतो. तिसरा हे सगळं बघत असतो, कुणी येऊ नये हे घडतंय बघायला याची काळजी घेतो किंवा तो पाकिट घेऊन पळून जातो.”
नरेंद्र मोदी, गौतम अदाणी आणि अमित शाह यांच्याविषयी काय म्हणाले राहुल गांधी?
“नरेंद्र मोदींचं काम तुमचं लक्ष भरकटवण्याचं आहे. त्यामुळेच ते समोरुन येतात. टीव्हीवर आपल्याशी संवाद साधतात. हिंदू-मुस्लिम, जीएसटी, नोटबंदी, मला फाशी द्या वगैरे वक्तव्य करतात. तेवढ्यात मागून अदाणी येतात तुमचे पैसे घेऊन जातात. तिसरा माणूस म्हणजे अमित शाह, ते कुणाला हे घडलंय कळू नये याची काळजी घेतात.” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि व्यावसायिक गौतम अदाणी यांची तुलना पाकिटमारांशी केली आहे.
याच वर्षी राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली होती. २०१९ च्या प्रचारसभेत मोदी आडनावाचे लोक चोर का असतात? हा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावरुन झालेल्या खटल्यात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि राहुल गांधींना खासदारकीही गमावावी लागली होती. मात्र या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. मोदी आडनावावरुन कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात २०१९ मध्ये मानहानीचा खटला गुजरात न्यायालयात दाखल करण्तात आला होता. गुजरात न्यायालयाने राहुल गांधींना ठोठावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यात आली, ज्यानंतर राहुल गांधींना खासदारकी परत मिळाली.