नवी दिल्ली : नवे संसद भवन देशातील १४० कोटी जनतेच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब असून ही इमारत आत्मनिर्भर आणि विकसित भारताची साक्षीदार असेल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. नव्या संसद भवनाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळय़ानंतर, लोकसभेच्या भव्य सभागृहात पहिले भाषण करताना मोदींनी, नवे संसद भवन भारताच्या लोकशाही परंपरेचाच नव्हे, तर वैश्विक लोकशाहीचाही आधार असल्याचे मत व्यक्त केले.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ावर काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष तसेच, अन्य २५ पक्ष कार्यक्रमात सहभागी झाले. नव्या संसद भवनावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादंगाचा उल्लेख करणे मोदींनी टाळले. मात्र, ‘नवीन पर्व के लिए, नवीन प्राण चाहिए’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रेरणादायी मानल्या गेलेल्या पद्याचा उल्लेख करत मोदींनी विरोधकांवर अप्रत्यक्ष प्रहार केला.




देशाच्या विकासयात्रेत काही अमर क्षण येतात, काही तारखा इतिहासात सुवर्णाक्षरामध्ये नोंदवल्या जातात. आजचा दिवस त्यापैकी एक असून स्वातंत्र्याच्या अमृतवर्षांमध्ये नवे संसद भवन म्हणजे देशाच्या लोकशाहीसाठी मिळालेली अमूल्य भेट आहे. नवे संसद भवन नवी प्रेरणा घेऊन आले आहे. नवा भारत, नवे लक्ष्य, नवा जोश, नवी आशा, नवा उत्साह, नवी दृष्टी, नवा संकल्प, नवा विश्वास लोकांमध्ये जागृत झाला आहे, असे मोदी म्हणाले. जे थांबतात, त्यांचे भाग्यही थांबते, पण जे निरंतर मार्गक्रमण करतात, त्यांना भाग्याचीही साथ मिळते. म्हणून सातत्याने पुढे चालत राहा, असा सल्ला मोदी यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींना दिला.
केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी केलेल्या सुमारे ९८० कोटींच्या खर्चावर विरोधकांनी टीका केली होती. त्यावर, या इमारतीची प्रत्येक वीट, प्रत्येक भिंत, प्रत्येक कण गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित केलेला आहे, अशा शब्दांत मोदींनी आरोपांना प्रत्युत्तर दिले. गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्र सरकारने गरिबांसाठी चार कोटी घरे, ११ कोटी शौचालये बांधली, ५० हजार अमृत सरोवर उभे केले. चार लाख किमीचे रस्ते बांधले गेले. नवी संसद बांधली जात असताना देशात ३० हजार पंचायत भवनही बांधली गेली आहेत. पंचायतीपासून संसदेपर्यंत गरिबांच्या विकासासाठी केंद्राची निष्ठा सारखीच आहे, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.
महात्मा गांधींच्या संपूर्ण स्वराज्याच्या संकल्पाची तुलना मोदींनी अमृतकाळाशी केली. ते म्हणाले की, १९४७ पूर्वी २५ वर्षे गांधीजींनी स्वराज्याचा संकल्प केला, त्याच्याशी लोकांना जोडले. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळू शकले. स्वातंत्र्याचा अमृतकाळ हा भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असून आणखी २५ वर्षांनी देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असताना विकसित झालेला असेल. भारत हा विश्वासाठी प्रेरणास्रोत आहे. भारतातील गरिबी दूर झाली तर अन्य देशांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
गुलामीच्या काळात भारताने गौरव गमावला होता. त्यानंतर अत्यंत खडतर प्रवास करून भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आता आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश केला आहे. नव्या संसदेच्या लोकसभेत सेन्गोल राजदंड स्थापित करून देशाचा गौरव, मान-सन्मान परत मिळाला आहे, असे मत मोदींनी मांडले. भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीचे दाखले वेदांमध्ये सभा-समितींच्या, महाभारतामध्ये गण आणि गणतंत्राच्या उल्लेखांमध्ये मिळतात. आधुनिक भारतात संविधान हाच लोकशाहीचा मूलमंत्र आहे आणि त्या संविधानाचे सर्वोच्च प्रतिनिधित्व ही नवी संसद इमारत करत असून इथे परंपरा व वास्तू, कला व कौशल्य, संस्कृती व संविधानाचे सूर उमटले आहेत, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले..
- संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन हा देशाच्या विकास प्रवासातील एक ‘अमर’ क्षण आहे. हे संसद भवन आत्मनिर्भर आणि विकसित भारताची पहाट असून ती अन्य देशांच्या विकासालाही प्रेरणा देईल. – संसदेच्या नव्या इमारतीत ‘नव्या भारता’ची आकांक्षा आणि संकल्प प्रतिबिंबित झाले असून त्याद्वारे आणखी मोठी उंची गाठण्यासाठी कार्य केले जाईल.
- या भवनात घेतलेला प्रत्येक निर्णय भारताच्या गौरवशाली भविष्याची पायाभरणी करेल. गरीब, दलित, मागास, आदिवासी, अपंग आणि इतर उपेक्षित घटकांच्या सशक्तीकरणाचा मार्ग येथून जाईल.
- या इमारतीची प्रत्येक वीट आणि भिंत गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे.
- गांधींच्या चळवळीमुळे लोकांमध्ये नवी चेतना निर्माण झाली आणि त्यांनी स्वत:ला स्वातंत्र्यासाठी वाहून घेतले होते. पुढील २५ वर्षांत प्रत्येक नागरिकाने विकसित भारतासाठी असेच काम केले पाहिजे.
- नवी संसद १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. जगाला भारताच्या संकल्पाचा संदेश देणारे लोकशाहीचे मंदिर आहे.
- विविधता ओतप्रोत भरलेला, प्रचंड लोकसंख्येचा भारतासारखा देश जेव्हा विविध आव्हानांना तोंड देत, विश्वासाने पुढे सरकतो, तेव्हा जगातील अनेक देशांना प्रेरणा मिळते.
आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. मात्र, देश काही वर्षे मागे जातो की काय, अशी चिंता वाटत आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही, मात्र आज संसदेत जे काही घडले ते एकदम उलट होते. संसदेच्या उद्घाटन सोहळय़ाला उपस्थित नव्हतो ते बरे झाले.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राज्याभिषेक पूर्ण झाला. अहंकारी राजा रस्त्यावर जनतेचा अवाज दडपून टाकत आहे. संसद हा जनतेचा आवाज असतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उद्घाटन सोहळय़ाला स्वत:चा राज्याभिषेक मानत आहेत.