आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही प्रचाराचा धडाका उडाला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांनाही मुलाखती देत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढील २५ वर्षांचं नियोजन स्पष्ट केलं. पुढील २५ वर्षांत देश कसा पाहिजे, याबाबत त्यांनी नियोजनाला सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी दीर्घकाळासाठी मुख्यमंत्री राहिलो आहे. सतत निवडणुका आणि आचारसंहिता असल्याने माझ्या राज्यातील चांगले अधिकारी दुसऱ्या राज्यात निरिक्षक म्हणून इलेक्शन ड्युटीला जायचे. त्यामुळे मला चिंता असायची की माझं राज्य कसं चालवू? कारण सतत कुठे ना कुठे निवडणुका असायच्या आणि अधिकारी जात असत. परंतु, ही माझी सुट्टी नसायची. मी निवडणुका सुट्ट्यांप्रमाणे लढवत नाही. मी तेव्हाही शंभर दिवसांचं प्लानिंग करायचो.
निवडणुकीला उतरण्याआधी अधिकाऱ्यांना कामाला लावलं
“मी निवडणुकीत जाण्याआधीच तयारीला लागलो आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून २०४७ ला डोक्यात ठेवून काम करतोय. त्यासाठी देशभरातील लोकांच्या सूचना मागवल्या. १५ लाखांहून अधिक लोकांनी याबाबत सूचना पाठवल्या आहेत. येणाऱ्या २५ वर्षांत भारत कसा पाहिजे यावर नागरिकांचे निवेदन घेतलं आहे. विविध विद्यापीठ, संस्थांना एकत्रित केलं. १५-२० लाख लोकांनी यावर अहवाल दिला. मग एआयच्या मदतीने त्याचं विभाजन केलं”, असं मोदी म्हणाले.
हेही वाचा >> “पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पुढील २५ वर्षांसाठी अधिकाऱ्यांची टीम
“विभाजनानंतर प्रत्येक विभागात अधिकाऱ्यांची टीम पुढील २५ वर्षांसाठी बनवली. अधिकाऱ्यांकडून या कामासाठी मी प्रेझेंटनेश घेतलं. प्रत्येक विभागावर दोन-अडीच तास चर्चा केली. मला वाटतं की मी हे काही कागदपत्र बनवतो आहे, हे व्हिजन मोदींची पोपटपंची नाहीय. १५-२० लाख लोक इन्पुट देत आहे म्हणजे संपूर्ण देशाचा यात समावेश आहे”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा >> “…तर सगळ्यांना पश्चाताप होईल”; निवडणूक रोख्यांवरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा
“निवडणूक झाल्यानंतर हा अहवाल राज्यांना पाठवला जाणार. मग राज्यात यासंदर्भात चर्चा होईल. राज्यातून अहवाल आल्यानंतर यावर निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर व्यापक चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल”, असं मोदींनी स्पष्ट केलं.
पहिल्या शंभर दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेतले
“मी तीन विभागात याचं नियोजन केलं आहे. २५ वर्षांचं नियोजन, मग पाच वर्षांचं आणि पुढील शंभर दिवसांचं वेळापत्रक बनवून अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. २०१९ मध्येही निवडणुकीत उतरण्याआधी मी अधिकाऱ्यांना १०० दिवासांसाठी कामाला लावलं होतं. निवडणुका संपल्यानंतर मी पुन्हा कार्यरत झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत मी कलम ३७० हटवला, मग तीन तलाक कायदा रद्द केला, बँकांचं एकत्रितकरण, प्राण्यांचं लसीकण केलं”, असं मोदी म्हणाले.