PM Modi Urges MPs To Meet Traders To Promote GST 2.0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एनडीएच्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील व्यापारी आणि जनतेशी थेट संवाद साधून जीएसटी सूसुत्रीकरण आणि “मेक इन इंडिया” मोहिमेला सक्रियपणे प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारला असा विश्वास आहे की, नवीन उपाययोजनांमुळे नागरिकांवरील कराचा भार कमी होईल आणि व्यापक आर्थिक विकासाला चालना मिळेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी २.० वर झालेल्या बैठकीत, पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांना २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी कर प्रणालीचे फायदे सांगण्यासाठी स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांसह २० ते ३० मेळावे आयोजित करण्याचे निर्देश दिले. सुधारित जीएसटी कर रचनेत ५ टक्के आणि १८ टक्के असे दोन प्राथमिक कर स्लॅब समाविष्ट आहेत.
पंतप्रधानांनी एनडीएच्या सर्व खासदारांना नवरात्र आणि दिवाळी दरम्यान स्वदेशी मेळावे आयोजित करण्याचे आवाहन केले, जेणेकरून भारतात बनवलेल्या वस्तूंच्या खरेदीला प्रोत्साहन मिळेल. या कार्यक्रमांमधून स्थानिक कारागिरांचे तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे काम प्रकाशात आले पाहिजे, असे ते म्हणाले.
याव्यतिरिक्त, खासदारांना त्यांच्या मतदारसंघात “गर्वाने सांगा, हे स्वदेशी आहे” या थीम अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये प्रदर्शने आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी जीएसटी सुधारणांच्या नवीन टप्प्याचे वर्णन भारताच्या आर्थिक प्रवासातील एक प्रमुख टप्पा म्हणून केले आहे.
पंतप्रधानांच्या मते, या बदलांचा उद्देश जीवनावश्यक वस्तू, वाहने, उपकरणे आणि आरोग्य सेवांवरील कर कमी करून कुटुंबे, शेतकरी, तरुण आणि मध्यमवर्गावरील आर्थिक भार कमी करणे आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) सुसूत्रीकरणावर बोलताना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार टीका केली आणि म्हटले की, काँग्रेसने दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, अन्न आणि औषध यासारख्या वाटेल त्या गोष्टींवर कर लादला होता.
“टूथपेस्ट, साबण, केसांच्या तेलावर २७ टक्के कर, अन्नाच्या प्लेट्स, कप, चमच्यांवर १८ ते २८% कर आणि टूथ पावडरवर १७ टक्के कर आकारायचे. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे लोक मुलांच्या टॉफीवरही २१ टक्के कर घेत असत”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.