पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) २०३५ पर्यंत अवकाश स्थानकाची उभारणी करण्याचे आणि २०४० पर्यंत पहिल्या भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.

 ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी पंतप्रधानांना गगनयान मोहिमेच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ‘इस्रो’ २१ ऑक्टोबर रोजी प्रथमच अंतराळवीर बचाव यंत्रणा आणि इतर उपक्रमांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची भारताची मोहीम २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्यांनी शुक्र मोहीम आणि मंगळावरील अवतरणासह विविध आंतरग्रह मोहिमांसाठी काम करण्याचे आवाहन केले.