पीटीआय, तियान्जिन
भारत आणि चीन एकमेकांचे सहकारी भागीदार आहेत, प्रतिस्पर्धी नव्हेत, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी रविवारी घेतली. तियान्जिन येथे आयोजित करण्यात आलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांदरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
सीमावाद, व्यापार आणि गुंतवणूक हे मुद्दे मोदी आणि जिनपिंग यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होते. पूर्व लडाखमध्ये २०२०मध्ये झालेल्या लष्करी संघर्षानंतर, गेल्या वर्षाच्या अखेरपासून संबंध सुरळीत करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्काच्या पार्श्वभूमीवर हे संबंध अधिक दृढ करण्याला वेग मिळाल्याचे दिसत आहे. यामुळेच, पंतप्रधान मोदी यांनी सात वर्षांनंतर केलेल्या चीन दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
‘सीमावादावर न्याय्य, वाजवी आणि परस्परमान्य तोडगा काढण्याच्या दिशेने काम केले जाईल. तसेच, जागतिक व्यापार स्थिर करण्यामध्ये योगदान देण्याची गरज लक्षात घेऊन व्यापार आणि गुंतवणुकीतील संबंध वाढवू,’ अशी ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली. यावेळी, जिनपिंग यांनी अशी भूमिका मांडली की, दोन्ही देशांनी एकत्र येऊन विकासाच्या संधी साधाव्यात. यामध्ये कोणाचेही नुकसान होणार नाही. एका दिशेने एकत्र वाटचाल केल्यास द्विपक्षीय संबंध दीर्घकाळासाठी दृढ होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘ड्रॅगन’ आणि ‘हत्ती’ एकत्र येऊन उत्तम विकास साधतील असे ते म्हणाले.
दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भारत-चीन संबंधांमध्ये सातत्याने प्रगती होण्यासाठी सीमावर्ती भागात शांतता राहणे महत्त्वाचे असल्याचे मोदींनी अधोरेखित केले. तसेच, दोन्ही देशांतील संबंध परस्परविश्वास, आदर आणि संवेदनशीलता यांवर आधारित पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी द्विस्तरावरील व्यापार, गुंतवणुकीत वाढ करण्याची, व्यापार तूट कमी करण्याची हमी दिली. दहशतवाद, बहुस्तरावरील न्याय्य व्यापार यांसारख्या मुद्द्यांवर द्विस्तरावरील, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर समान भूमिकेचा विस्तार व्हावा, यांवर उभय नेत्यांमध्ये एकमत झाले.
‘संवाद फलदायी’
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबरील संवाद फलदायी झाल्याचे पंतप्रधान मोदींनी समाजमाध्यावरील पोस्टमध्ये नमूद केले. त्यांनी लिहिले की, “कझानमधील भेटीनंतर भारत आणि चीनमधील सकारात्मक संबंधांचा आम्ही आढावा घेतला. परस्परहित, परस्परांचा आदर आणि परस्परसंवेदनशीलता यांवर आधारित सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत. दोन्ही देशांतील २.८ अब्ज नागरिकांच्या हिताशी आपल्यातील सहकार्य जोडले गेले आहे.”
भारत आणि चीन हे दोन्ही देश सामरिकदृष्ट्या स्वायत्त आहेत. या द्विपक्षीय संबंधांकडे तिसऱ्या देशाच्या चष्म्यातून पाहिले जाऊ नये. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सीमाभागात शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही शेजारी देशांनी एकत्र काम करावे. भारत-चीन एकमेकांचे सहकारी भागीदार आहेत. शत्रू नव्हेत. – क्षी जिनपिंग, अध्यक्ष, चीन
परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन?
- यशस्वी सैन्यमाघारीवर दोन्ही देश समाधानी
- या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींकडून महत्त्वाचे निर्णय
- थेट विमानसेवा, व्हिसा सुविधा, कैलास मानससरोवर यात्रा यांसारख्या माध्यमांतून नागरिकांमधील आपापसातील संबंध वाढविण्याची गरज व्यक्त.
- भारतात पुढील वर्षी होणाऱ्या ‘ब्रिक्स’ परिषदेचे जिनपिंग यांना निमंत्रण
- चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य कै छी यांची मोदी यांनी भेट घेतली.
‘टिकटॉक’ पुन्हा भारतात?
‘बाइटडान्स’ या चीनमधील ‘टिकटॉक’ या मूळ कंपनीने गुरुग्राम येथे दोन पदांसाठी जागा असल्याचे ‘लिंक्डइन’वर जाहीर केले आहे. त्यामुळे ‘टिकटॉक’ कंपनी पुन्हा भारतात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच, कंपनीचे संकेतस्थळही अल्प प्रमाणात कार्यान्वित झाले आहे. भारत हे ‘टिकटॉक’ची दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ होती. २०२० मध्ये यावर बंदी घालण्यात आली. ‘टिकटॉक’सह इतर ५८ चिनी ॲपवर बंदी घालण्यात आली होती. या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.