पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार १५ जूनपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कॅनडामध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणे हा त्यांच्या या परदेश दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. त्याशिवाय सायप्रस आणि क्रोएशिया या देशांनाही ते भेट देणार आहेत. मोदी यांच्या दौऱ्याची सुरुवात सायप्रस भेटीने होणार असून त्यानंतर ते कॅनडामध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होतील. ही शिखर परिषद कनानस्किस येथे होणार आहे. मोदी १६ आणि १७ जून रोजी परिषदेत सहभागी होतील. त्यापूर्वी १५ आणि १६ जून रोजी ते सायप्रसला असतील.
सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडलाइड्स यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. ते राजधानी निकोसियामध्ये अध्यक्ष क्रिस्टोडलाइड्स यांच्याशी चर्चा करतील आणि लिमासोलमध्ये व्यावसायिक नेत्यांची भेट घेतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात नमूद केले आहे. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, १८ जून रोजी मोदी क्रोएशियाला भेट देतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
परिषदेत सहाव्यांदा सहभाग
जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांचा सलग सहावा सहभाग असेल. या परिषदेत, ते जी-७ देशांचे नेते, इतर आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, विशेषत: ‘एआय’-ऊर्जा संबंध आणि क्वांटम-संबंधित मुद्द्यांसह महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या परिषदेदरम्यान पंतप्रधान अनेक द्विपक्षीय बैठकादेखील घेतील.