Prince Andrew : ब्रिटनच्या राजघराण्याला शतकानुशतकाचा इतिहास आहे. जगातील सर्वात जुने, श्रीमंत आणि लोकप्रिय राजघराणे म्हणून ब्रिटनच्या राजघराण्याकडे पाहिलं जातं. मात्र, मागील काही महिन्यांपासून या राजघराण्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्यातील वाद आता अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांचे भाऊ प्रिन्स अँड्र्यूज यांची राजघराण्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रिन्स अँड्र्यूज यांच्याकडून त्यांच्या पदव्या काढून घेण्यात आल्या आहेत. तसेच ब्रिटनमधील बकिंगहॅम पॅलेसमधून प्रिन्स अँड्र्यू यांना बाहेर काढण्यात आल्याचीही चर्चा आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, ब्रिटिश राजा चार्ल्स तिसरा यांचे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की ते त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व शाही पदव्या सोडणार आहेत. प्रिन्स अँड्र्यू यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की ते आता ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ या सारख्या पदव्या वापरणार नाहीत. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच आता प्रिन्स अँड्र्यू यांच्याकडून पदव्या काढून घेतल्याची आणि त्यांना बकिंगहॅम पॅलेसमधून बेदखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

बकिंगहॅम पॅलेसने गुरुवारी या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. त्या निवेदनात म्हटलं की, “ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे त्यांचे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांच्या उर्वरित सर्व पदव्या काढून घेण्यात येत आहेत आणि त्यांना राजघराण्यातून बेदखल करण्यात येत आहे. तसेच ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनी आज प्रिन्स अँड्र्यू यांच्या सर्व पदव्या आणि त्यांचा सन्मान काढून टाकण्याच्या संदर्भातील सर्व औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे”, असं बकिंगहॅम पॅलेसच्या निवेदनात म्हटलं आहे.

प्रिन्स अँड्र्यू आता राजकुमार राहिले नाहीत

“प्रिन्स अँड्र्यू हे आता फक्त अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर म्हणून ओळखले जातील, म्हणजे ते आता राजकुमार राहिले नाहीत. तसेच ते आता त्यांच्या पर्यायी खासगी निवासस्थानात जातील आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जाईल”, असं निवेदनात म्हटलं.

प्रिन्स अँड्र्यू यांच्या मुलींच्या शाही पदव्या कायम

एका वृत्तानुसार, प्रिन्स अँड्र्यू यांच्या पदव्या जरी काढून घेण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या मुलींच्या पदव्या कायम राहतील. प्रिन्स अँड्र्यू यांची पत्नी सारा फर्ग्युसन यांना देखील बकिंगहॅम पॅलेसमधून बेदखल करण्यात आलं आहे. कारण प्रिन्स अँड्र्यू आणि सारा फर्ग्युसन यांचा १९९६ मध्ये घटस्फोट झालेला आहे. पण तरीही त्या प्रिन्स अँड्र्यू यांच्याबरोबर त्याच निवासस्थानी राहत होत्या. दरम्यान, अहवालात पुढं असंही म्हटलं आहे की प्रिन्स अँड्र्यू यांनी त्यांच्या पदव्या काढून घेतल्याच्या निर्णयावर काहीही आक्षेप घेतला नाही.