नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झालेला राजपुत्र विल्यिम याने आपल्या ‘रॉयल एअर फोर्स’मधील सेवेतून निवृत्ती स्वीकारली आहे. आपला आवश्यक कार्यकाल पूर्ण केल्यानंतर, राजघराण्याप्रती असलेल्या कर्तव्यांची पूर्तता करण्यासाठी तसेच धर्मादाय कामे करण्यासाठी आपण सेवेतून निवृत्त होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
३१ वर्षीय प्रिन्स विलियम आणि त्यांच्या पत्नी केट मिडलटन हे दोघेही यापुढे राजघराण्याच्या जबाबदाऱ्या आणि धर्मादायी कामांमध्ये लक्ष घालणार असल्याचे ‘केन्सिंग्टन पॅलेस’च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. विलियम यांना वन्यजीव संवर्धनाची आवड असून सध्या अतिशय धोका असलेल्या जीवांचे संवर्धन करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील असे प्रवक्ते म्हणाले.
युवक आणि लहान मुले यांसाठी सुरू असलेल्या त्यांच्या सामाजिक कार्यात पुन्हा एकदा उत्साहाने सक्रिय होण्याची राजपुत्र विलियम यांची इच्छा आहे. त्यांनी स्वत: संरक्षण दलात काम केले असल्याने लष्करी सेवेतच असलेल्या नागरिकांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठीसुद्धा काही भरीव कार्य करावे, असे विलियम यांच्या मनात आहे.
अनेक क्षेत्रांची आवड आणि विविध क्षेत्रांमधील निकड लक्षात घेत आपल्याला नेमके कोणत्या क्षेत्रात संपूर्णपणे झोकून द्यायचे, याचे सर्व पर्याय विलियम सध्या चाचपून पाहात असल्याचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. याबाबतची सविस्तर आणि नेमकी घोषणा लवकरच करण्यात येईल, असेही प्रवक्त्याने नमूद केले.
राणी एलिजाबेथ द्वितीय यांचा नातू आणि डय़ुक ऑफ केंब्रिज राजपुत्र विलियम रॉयल एअर फोर्समध्ये ‘सर्च अँड रेस्क्यू’ वैमानिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या तीन वर्षांच्या सेवाकालाचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. मात्र आता लोकसेवेच्या कामात उतरावयाचे असल्याने ते मुदतवाढ घेण्याची शक्यता नाही.
लवकरच राजपुत्र विलियम आपली पत्नी केट आणि मुलासह केन्सिंग्टन पॅलेस या आपल्या अधिकृत निवासस्थानी परततील असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. राजपुत्राने वैमानिक म्हणून अत्यंत दिमाखदार कामगिरी केली आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी एकूण १३०१ तासांचे हवाई उड्डाण केले आहे. गरजेला धावून येत, त्यांनी अनेकदा पर्वतीय धोकादायक भागातून बचावकार्य केले आहे, असे एअर चीफ मार्शल सर अँड्रय़ू पुलफोर्ड यांनी सांगितले.
युवक आणि लहान मुले यांसाठी सुरू असलेल्या त्यांच्या सामाजिक कार्यात पुन्हा एकदा उत्साहाने सक्रिय होण्याची राजपुत्र विलियम यांची इच्छा आहे. त्यांनी स्वत: संरक्षण दलात काम केले असल्याने लष्करी सेवेतच असलेल्या नागरिकांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठीसुद्धा काही भरीव कार्य करावे, असे विलियम यांच्या मनात आहे.