मॉस्को :‘वॅग्नेर’ या खासगी लष्करी गटाने रशियात बंड पुकारत अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरूद्ध दंड थोपटले. ‘वॅग्नेर’ने शनिवारी अनेक सैन्यतळ ताब्यात घेऊन मॉस्कोकडे कूच केल्याने गेल्या दोन दशकांहून अधिक काळ क्रौर्य आणि युद्धखोरीमुळे जगभरात रोषास सामोरे जाणाऱ्या पुतिन यांच्यापुढे मोठे आव्हान उभे ठाकले. पुतिन यांनी तात्काळ देशाला उद्देशून भाषण करीत ‘वॅग्नेर’चे बंड मोडून काढण्याचे आदेश लष्कराला देतानाच ‘देशद्रोह्यां’ना कठोर शिक्षा करण्याचा इशारा दिला.

रशियाच्या बाजूने युक्रेनमध्ये लढत असलेल्या ‘वॅग्नेर’ या खासगी सैन्याने शनिवारी रशियातील रोस्टोव्ह-ऑन-डॉन या नैर्ऋत्येकडील शहरातील रशियन सैन्यतळ ताब्यात घेतला. हे शहर युक्रेन सीमेलगतच आहे. रशियाच्या उत्तरेकडील व्हेरोनेझ भागासह लिपेत्स्क प्रांतातही या खासगी सैनिकांनी सरकारी सैन्याला आव्हान दिले असून, रशियाच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील तीव्र संघर्षांतून हे बंड उद्भवल्याचे मानले जाते.

बंडाच्या धक्क्याने उद्विग्न आणि संतप्त झालेल्या पुतिन यांनी तातडीने देशाला उद्देशून भाषण केले. ज्यांनी देशाशी द्रोह केला, त्यांना कठोर शिक्षा केली जाईल. वॅग्नेरचे बंड मोडून काढण्यासाठी लष्कराला आवश्यक ते आदेश दिले आहेत, असे त्यांनी नागरिकांना सांगितले.

‘‘रशियाच्या सरकारी सैन्याने वॅग्नेरच्या सैनिकांवर हल्ला केला आहे. त्यामुळे आपल्या हजारो सैनिकांनी शत्रूचा सूड घेण्यासाठी पुढे यावे’’, असे आवाहन वॅग्नरचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांनी ध्वनिचित्रफीतीद्वारे केले. त्यानंतर रशियाच्या अधिकाऱ्यांनी वॅग्नेर यांच्यावर बंडाळीचा आरोप केला. रशियाच्या सैन्याधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ध्वनिचित्रफीतींत वॅग्नेरच्या सैनिकांना आपल्याशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. वॅग्नेरच्या सैनिकांनी रोस्टोव्ह-ऑन-डॉनमधील मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्याचे शनिवारी सकाळी समाजमाध्यमांत प्रसारित झालेल्या ध्ननिचित्रफीतींमध्ये दिसून आले. याच ठिकाणाहून युक्रेनवरील चढाईची सूत्रे हलविली जातात.

प्रिगोझिन यांनी एका लष्करी इमारतीसारख्या ठिकाणी चित्रित केलेल्या फीतीमध्ये रशियाच्या लष्करी उच्चाधिकाऱ्यांचा उल्लेख विदूषक असा केला आहे. युक्रेनमधील चढाई रशियाला सुरू ठेवता येईल, पण त्यासाठी रशियाच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याने आपल्याशी बोलणी केली पाहिजे. अन्यथा आम्ही मॉस्कोच्या दिशेने कूच करू, अशा इशारा प्रिगोझिन यांनी दिला.

रशियाच्या उत्तरेकडील पावलोव्हस्क या शहरातील स्थिती अधिक तणावपूर्ण आहे. तिथे हल्ल्यांसाठी हेलिकॉप्टर वापरली जात असल्याचे ध्वनिचित्रफीतींमध्ये दिसून आले. असे एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा वॅग्नेरने केला. त्यामुळे तेथून पुढे कूच केली, असेही त्यांनी म्हटले आहे. रशियामधील या बंडामुळे युक्रेनच्या फौजांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी, त्याचा लष्करी लाभ ते कितपत उठवू शकतील, याची उत्सुकता आहे.

प्रिगोझिन यांनी अनेकदा संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू तसेच लष्करी दलांचे प्रमुख व्हॅलेरी जिरासिमोव्ह यांच्या समर्थकांचा उल्लेख पळपुटे असा केला आहे. या लोकांकडून वॅग्नेरला जाणीवपूर्वक अन्न आणि दारूगोळय़ाची रसद पुरवली जात नव्हती, असाही त्यांचा आरोप आहे.

वॅग्नेरमध्ये अनेक जण आधी शिक्षा भोगलेले आरोपी आहेत. त्यांना माफीचे आश्वासन देण्यात आले आहे. अनेकदा अशा एकेकाळच्या गुन्हेगारांची युद्धातील कामगिरी ही नियमित रशियन सैनकांपेक्षा उत्तम ठरली आहे.

रशियाचे लष्करप्रमुख आणि प्रिगोझिन यांच्यातील शत्रुत्व गेल्या काही महिन्यांपासून दिसून येत होते. लष्करप्रमुखांवर निष्क्रीय तसेच भ्रष्ट असल्याचा आरोप प्रिगोझिन यांनी केला होता. पण, प्रिगोझिन यांनी आधी पुतिन यांना थेट लक्ष्य केले नव्हते. मात्र, प्रिगोझिन यांनी २३ जूनच्या ध्ननिचित्रफीत संदेशात युक्रेनवरील चढाईच्या पुतिन यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रशियाकडून या चढाईचा उल्लेख विशेष लष्करी मोहीम असा केला जातो. खरेतर युक्रेनकडून रशियाला तसा कोणताही धोका नव्हता. पण पुतिन यांनी नव्हे तर, त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि बढाईखोरीसाठी हे पाऊल उचलण्यास भाग पाडले, असे प्रिगोझिन यांनी म्हटले आहे.

नागरी युद्धाचा प्रयत्न असफल

बंडाद्वारे देशात अस्थिरता निर्माण करून नागरी युद्ध घडविण्याचा प्रयत्न असफल ठरल्याचा दावा रशियाच्या परराष्ट्र गुप्तचर सेवेचे प्रमुख सर्गेई नरीश्कीन यांनी केला.

जी-७देशांकडून आढावा

रशियातील बंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत ‘जी-७’ देशांनी शनिवारी आढावा घेतला. युक्रेनला पाठबळ देण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असा पुनरूच्चार अमेरिकी परराष्ट्रमंत्री अ‍ॅन्टनी ब्लिंकन यांनी केला. युक्रेनबाबत सहकारी देशांबरोबरील समन्वय कायम राहील, असे ब्लिंकन यांनी स्पष्ट केले.

बंड करणारे देशद्रोही आहेत. त्यांनी पाठित खंजीर खुपसला असून, त्यांना या विश्वासघाताची कठोर शिक्षा अटळ आहे. लष्कर आणि सरकारी यंत्रणांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. रशिया आज जनतेचे भविष्य, सार्वभौमत्वासाठी लढत आहे. त्यासाठी सर्व जनतेने सरकारशी एकनिष्ठ राहावे.– व्लादिमिर पुतिन, अध्यक्ष, रशिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे लष्करी बंड नव्हे, तर न्यायासाठीचा लढा आहे. आम्ही देशभक्त आहोत. आम्ही देशासाठी लढलो आणि लढत राहू. आम्हाला देशद्रोही ठरवून अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गंभीर चूक केली आहे. आमच्यापैकी कुणीही त्यांना दाद देणार नाही. आम्हाला भ्रष्टाचार, कपट-कारस्थान, सरकारी लालफीतशाहीच्या दलदलीतून रशियाला बाहेर काढायचे आहे. -येवजेनी प्रिगोझिन, ‘वॅग्नेर’  प्रमुख