काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना दुर्योधनाशी केली आहे. त्या म्हणाल्या, देशाचे लक्ष विचलीत करण्याचे काम सध्या सुरु आहे. देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही. इतिहास याची साक्ष देतो, दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता, असे सांगत त्यांनी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेतील काही ओळी वाचून दाखवल्या.


हरयाणातील अंबाला येथे एका प्रचार सभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, अहंकारी व्यक्तीच्या पाडावाची इतिहास आपल्याला साक्ष देतो, महाभारतात जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावण्यासाठी गेले होते. तेव्हा दुर्योधनाने त्यांनाच कैद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी कृष्णाच्या विशाल रुपासमोर दुर्योधनाचा अहंकार नष्ट झाला होता.

त्या पुढे म्हणाल्या, निवडणूक प्रचारात भाजपाच्या नेत्यांनी आपण दिलेल्या आश्वासनांचे काय झालं हे कधीही सांगितलेलं नाही. उलट कधी शहिदांच्या नावांनी मत मागितली तर कधी माझ्या कुटुंबातील शहीद सदस्यांचा अपमान केला गेला. मात्र, हा अपमान सहन केला जाणार नाही. उलट काँग्रेस ही निवडणूक मुद्द्यांवर लढवत आहे.

आपल्या देशाची जनता खूपच विवेकी आहे. जनतेचा हा विवेक नवा नाही खूप जुना आहे. आपण देशाच्या जनतेला मुर्ख बनवू शकत नाही. ही निवडणूक कोणा एका कुटुंबासाठी नाही तर त्या कुटुंबांसाठी आहे ज्यांच्या इच्छा-आकांक्षा या पतंप्रधानांनी धुळीला मिळवल्या आहेत, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला.