काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे. संकल्प सत्याग्रह काँग्रेसने पुकारला आहे. या दरम्यान प्रियंका गांधी यांनी बोलताना ३२ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगितला आहे. प्रियंका गांधी यांनी गांधी परिवारावर टीका करणाऱ्या नेत्यांवरही प्रियंका गांधी यांनी टीका केली. या देशाच्या लोकशाहीला माझ्या कुटुंबाने रक्त शिंपडलं आहे. त्यामुळे तुम्ही अशा कुटुंबाचा अपमान कसा काय करू शकता असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी विचारला आहे.

काय म्हटलं आहे प्रियंका गांधी यांनी ?

“माझे वडील राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर १९९१ मध्ये माझ्या वडिलांच्या पार्थिवाची अंत्यायात्रा तीन मूर्ती भवन या ठिकाणाहून निघाली होती. त्यावेळी आई (सोनिया गांधी) मी आणि राहुल आम्ही एका गाडीमध्ये बसलो होतो. आमच्यासमोर भारतीय लष्कराने एक ट्रक आणला होता जो फुलांनी सजवला होता. त्या ट्रकवर माझ्या वडिलांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. थोडंसं पुढे गेल्यानंतर राहुल म्हणाला मला खाली उतरायचं आहे. तेव्हा आईने नकार दिला. कारण सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. आई नाही म्हणाली तरीही राहुल गाडीमधून खाली उतरला आणि वडिलांच्या अंत्ययात्रेसोबत चालला. आत्ता आपण इथे उभे आहोत इथून साधारण थोडसंच दूर असलेल्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या पार्थिवावर राहुलने अंत्यसंस्कार केले.”

मला आजही ते दृश्य आठवतं

” राहुल गाडीमधून उतरून वडिलांच्या अंत्ययात्रेत गेला होता. मला आजही ते दृश्य आठवतं. माझ्या वडिलांचं पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आलं होतं. त्या अंत्ययात्रेच्या मागे मागे चालत राहुल राजघाटपर्यंत आला होता. देशासाठी शहीद झालेल्या माझ्या वडिलांचा अपमान संसदेत करण्यात येतो. एका शहीद वडिलांच्या मुलाला देशाच्या संसदेत देशद्रोही म्हटलं जातं, मीर जाफर म्हटलं जातं. एवढंच नाही त्या माझ्या आईचाही अपमान केला जातो. मोदी सरकारमध्ये बसलेले मंत्री माझ्या आईचा (सोनिया गांधी) अपमान करतात. एका मंत्र्याने तर असं वक्तव्य केलं होतं की राहुल गांधींना हेही ठाऊक नाही की त्यांचे वडील कोण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते की नेहरुंचा अभिमान वाटतो तर ते आडनाव का स्वीकारलं नाही? त्यावेळी पंतप्रधान मोदींवर तर कुठलाच खटला भरला गेला नाही, त्यांचं सदस्यत्वही रद्द झालं नाही.” असं म्हणत प्रियंका गांधी यांनी ३२ वर्षांपूर्वीचा प्रसंग सांगितला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, “भाजपाकडून सातत्याने आमच्या कुटुंबाचा अपमान केला जातो. संसदेत माझ्या भावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली होती आणि सांगितलं होतं की मी तुमचा तिरस्कार करत नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. पण आम्ही तिरस्कार पसरवणाऱ्या विचारधारेचे नाही असंही राहुलने सांगितलं होतं. काँग्रेसने आज संकल्प सत्याग्रह पुकारला आहे. त्यात पुढे त्या म्हणाल्या की, “जर तुम्ही आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करत असाल तर मला सांगा भगवान श्रीराम कोण होते? त्यांना वनवासात धाडण्यात आलं. मात्र त्यांनी आपल्या कुटुंबाबतचं जे कर्तव्य होतं त्याचं पालन केलं. मग राम घराणेशाही मानणारे होते का? “असाही प्रश्नही प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.