scorecardresearch

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होताच प्रियंका गांधींचा हल्लाबोल; म्हणाल्या, “घाबरलेलं सरकार…”

राहुल गांधींनी मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानावरून त्यांना सुरत न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

priyanka gandhi
राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होताच प्रियंका गांधींचा हल्लाबोल; म्हणाल्या, "घाबरलेलं सरकार…"

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावर टीका करणं महागात पडलं आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यावर आज ( २३ मार्च ) गुजरातमधील सुरत येथील न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे’, असा सवाल उपस्थित केला होता. याविरोधात गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी होत, सुरतमधील सीजेएम न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

हेही वाचा : अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्याची सीबीआयने चौकशी करावी; राहुल गांधींच्या बचावासाठी काँग्रेसचा भाजपावर प्रतिहल्ला

न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. “घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझा भाऊ कधी घाबरला आणि घाबरणारही नाही… सत्य बोलत आलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे,” असं प्रियंका गांधींनी ट्वीट करत म्हटलं.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ६ व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा, म्हणाले, “भारत आज …”

दरम्यान, राहुल गांधी आज न्यायालयात पोहचले होते. तेव्हा न्यायालयाने राहुल गांधींना तुम्हाला काही मत मांडायचं आहे का? असं विचारलं. त्यावर ‘मी सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहे. कोणाच्या विरोधात जाणूनबुजून बोललो नाही. त्याने कोणाचंही नुकसान झालं नाही,’ असं राहुल गांधींनी सांगितलं. याप्रकरणावर निकाल देताना कलम ५०४ अन्वये न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 13:58 IST

संबंधित बातम्या