नवी दिल्ली : थिएटर कमांडच्या रचनेत हवाई दलाच्या सैद्धांतिक पैलूंशी कोणत्याही प्रकारे तडजोड करता कामा नये, असे मत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी मंगळवारी व्यक्त केले. पूर्व लडाखमध्ये सर्व ठिकाणांवरून सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जैसे थे स्थिती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, थिएटर कमांड होण्यासाठी भारतीय हवाई दलाचा कोणताही विरोध नाही. पण या कमांडच्या रचनेबाबत आमचे काही मत आहे. ही रचना करताना हवाई दलाच्या सैद्धांतिक पैलूंशी कोणतीही तडजोड करता कामा नये.  

पूर्व लडाखमधील स्थितीबाबत ते म्हणाले, की काही ठिकाणी सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आधीसारखी स्थिती निर्माण होण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सर्वच ठिकाणांहून पूर्णपणे सैन्य माघारी घेतले गेले पाहिजे. अशा आदर्श स्थितीची आम्ही अपेक्षा करतो.

ते पुढे म्हणाले की, त्या भागात चिनी सैन्य आगळिक करो की न करो, तेथे पायाभूत सुविधा उभारणे, साधनसामग्रीची सज्जता, प्रशिक्षण आणि रणनीतीची आखणी ही कायम चालणारी प्रक्रिया आहे.

८ ऑक्टोबर हा हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत  चौधरी बोलत होते.  

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोग्रा हॉट स्प्रिंग भागातीतल गस्त िबदू क्रमांक १५ वरून नुकतेच सैन्य माघारी घेण्यात आले आहे. तेथील स्थितीबाबत त्यांनी सांगितले की, चिनी सैन्याच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.  प्रामुख्याने पूर्व लडाखमध्ये  पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत.

असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या भागात चीनच्या हवाई कारवाया वाढल्याबाबत विचारणा केली असता, चौधरी म्हणाले की, चीनकडूनही तेथे हवाई सुरक्षेत सातत्याने वाढ केली जाते. तेथे भारताने रडार आणि एसएजीडब्लू यंत्रणा वाढवून त्याचा एकात्मिक हवाई कमांडशी मेळ साधला आहे.