अलिगड : उत्तर प्रदेशात अलिगड येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापक महाविद्यालयाच्या हिरवळीवर नमाज़ पढत असल्याचा व्हिडीओ सर्वत्र पसरल्यानंतर आणि हिंदूत्ववादी युवा नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केल्यानंतर, या प्राध्यापकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

अलिगडच्या श्री वाष्र्णेय महाविद्यालयात ही घटना घडल्यानंतर, प्रा. एस.आर. खालिद यांना मंगळवारी एका महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या काही युवा नेत्यांनी या प्राध्यापकावर बेशिस्तीचा आणि सार्वजनिक स्थळी प्रार्थना करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा ठपका ठेवल्यानंतर, याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला असल्याचे महाविद्यालयाच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले.

या संबंधात कुवारसी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या संबंधात महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मिळाल्यानंतर याप्रकरणी कार्यवाही केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. महाविद्यालयाच्या परिसरात ‘नमाज़’ पढून संबंधित प्राध्यापक शांततामय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विद्यार्थी नेते दीपक शर्मा आझाद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.