नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांत शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये पोलिसाने केलेल्या गोळीबारात एक महिला ठार, तर दोनजण जखमी झाले. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या पोलिसानेही डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. 

उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारणपूरसह अन्य चार शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने करण्यात आली. सहारणपूर आणि प्रयागराज शहरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी सहा जिल्ह्यांतील शंभराहून अधिक निदर्शकांना अटक केली. प्रयागराजमध्ये निदर्शकांनी काही वाहनांची जाळपोळ केली आणि  पोलिसांची वाहनेही जाळण्याचा प्रयत्न केला. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर केला.

कोलकात्यात गजबजलेल्या पार्क सर्कस भागात निदर्शनांदरम्यान एका पोलिसाने सव्‍‌र्हीस रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. त्यात रिमा सिंघा ही फिजिओथेरपिस्ट ठार झाली, तर दोन जखमी झाले. रिमा भाडय़ाच्या मोटरसायकलने प्रवास करीत होत्या. या घटनेनंतर संबधित पोलिसाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचे नाव चेडूप लेपचा असे आहे. दरम्यान, निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर हावडा येथील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.

नमाज अदा केल्यानंतर दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीबाहेर भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. काही जणांनी मशिदीच्या पायऱ्यांवर निषेध फलक घेऊन शर्मा आणि जिंदल यांच्याविरोधात घोषणा दिल्या. ही निदर्शने १५ ते २० मिनिटे सुरू होती, त्यानंतर निदर्शक पांगले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. या संदर्भात जामा मशिदीचे शाही इमाम म्हणाले की, मशिदीच्या व्यवस्थापनाने असे कोणतेही आवाहन केले नव्हते. निदर्शनांची सुरुवात कोणी केली, हे आम्हाला माहीत नाही. शुक्रवारच्या नमाजानंतर काही लोकांनी घोषणाबाजी केली. मोठा जमावही होता; परंतु तो लवकरच पांगला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि संत यति नरसिंहानंद यांच्यासह ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात शर्मा, जिंदल यांच्यासह पत्रकार सबा नक्वी यांचेही नाव आहे.

काश्मीरमध्ये काही जिल्ह्यांत संचारबंदी, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तेथे काही ठिकाणी किरकोळ दगडफेक झाली. झारखंडमध्ये रांची येथे निदर्शकांना पांगवताना काही पोलीस जखमी झाले. कोलकाताच्या पार्क सर्कस परिसरात, हावडा, हैदराबादमधील चारमिनार, लुधियाना, अहमदाबाद येथेही निदर्शकांनी घोषणाबाजी केली.

झारखंडमध्ये पोलीस जखमी

रांचीत हनुमान मंदिराजवळ निदर्शने करणाऱ्या जमावाला नियंत्रित करताना काही पोलीस जखमी झाले. शुक्रवारच्या नमाजानंतर जमलेल्या जमावाने दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार आणि लाठीमारही केला. या वेळी काही पोलीस जखमी झाले.

बिहारमध्ये याचिका

बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये नूपुर शर्मा, नवीन जिंदल आणि नरसिंहानंद यांच्याविरुद्ध शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते एम. राजू नय्यर यांनी याचिका दाखल केली.

जामिया मिलियातही घोषणाबाजी

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही नूपुर शर्मा आणि जिंदल यांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून देशाला वाचवा आणि मुस्लिमांवरील हल्ले थांबवा, अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या.

काश्मीरमध्ये काही भागांत संचारबंदी

जम्मू-काश्मीरच्या दोडा आणि किश्तवाड जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली, तर काश्मीरमध्ये काही ठिकाणी बंदसदृश वातावरण होते. भदरवाह आणि किश्तवाड शहरांत इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली. भदरवाह येथे निदर्शकांनी रास्ता रोको केला. काही महिलांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला. या वेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली आणि सौम्य लाठीमार केला.

गुजरातमध्ये रास्ता रोको

नूपुर शर्मा आणि जिंदल यांना त्वरित अटक करा, अशी मागणी करीत गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा शहरांच्या काही भागांत तीव्र निदर्शने करण्यात आली. दरियापूर आणि करंज या मुस्लीमबहुल भागांतील बाजार आणि दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दरियापूरमध्ये अनेक मुस्लीम तरुण निषेध फलक घेऊन मुख्य रस्त्यावर उतरले होते.

काय घडले?

* कोलकात्यात पोलिसाच्या गोळीबारात महिला ठार, डोक्यात गोळी झाडून पोलिसाचीही आत्महत्या

* दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीबाहेर नमाजानंतर जमावाची निदर्शने, नूपुर शर्मा, जिंदल यांच्या अटकेची मागणी

*जामिया मिलिया इस्लामियामध्ये विद्यार्थ्यांचेही निषेध आंदोलन

* उत्तर प्रदेशात अनेक जिल्ह्यांत निदर्शने, प्रयागराज येथे दगडफेक, सहारणपूरमध्ये अनेक अटकेत

* गुजरातमध्ये अहमदाबाद, बडोद्यात बंद, रास्ता रोको

* झारखंडमध्ये जमावाला पांगवताना काही पोलीस जखमी, हवेत गोळीबार, भागांत संचारबंदी