पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटींच्या घोटाळ्याची माहिती संसदेच्या लोकलेखा उपसमितीने मागविली असून महसूल सचिव, सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर विभाग आणि कस्टम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. १ मार्चपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी हजर राहावे, असा आदेश उपसमितीने काढला आहे.

सन २०१३मध्ये केंद्र सरकारने सोन्याची आयात रोखण्यासाठी लागू केलेली ८०:२० सोनेआयात योजना आणि पीएनबी-मोदी घोटाळा या दोन्हींबाबत लोकलेखा उपसमिती संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेईल. या योजनेनुसार आयात सोन्यापैकी ८० टक्के सोने प्रक्रियेनंतर निर्यात करण्याचे बंधन सोने व्यापाऱ्यांवर होते. सोनेआयात योजनेचा नीरव मोदी आणि मेहल चोक्सी यांनी गैरफायदा घेतल्याचा संशय आहे. पीएनबी-मोदी घोटाळ्याची चौकशी कोणत्या टप्प्यावर आली असून त्याची दिशा काय आहे याचाही तपशील उपसमितीने मागवला आहे.

पाच बँकांकडे नॉस्ट्रोखात्यांची विचारणा

पंजाब नॅशनल बँकेच्या ‘नॉस्ट्रो’ खात्यांबाबत सीबीआयकडून विचारणा करण्यात आली आहे. एखाद्या बँकेने विदेशी चलनात दुसऱ्या बँकेच्या विदेशी शाखेत खाते उघडणे म्हणजे नॉस्ट्रो खाते. या खात्याद्वारे खातेदारांना विदेशी व्यापार करणे सुलभ जाते. या खात्यांतून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना २९३ बनावट हमीपत्रे देण्यात आली होती. त्यामुळेच पीएनबीच्या नॉस्ट्रो खात्याची माहिती सीबीआय गोळा करत आहे. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, अलाहाबाद बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या पाच बँकांमध्ये पीएनबीची नॉस्ट्रो खाती आहेत. या पाच बँकांची बेल्जियमधील अ‍ॅण्टवर्प, फ्रँकफर्ट, मॉरिशस, हाँगकाँग आणि बहरिन या देशांमध्ये शाखा आहेत.