AAP MLA Arrested for Rape case: आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांना बलात्कार आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र कर्नाल येथील पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच गोळीबार करत तिथून पळ काढल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पंजाबच्या सनौर विधानसभेचे आमदार असलेल्या हरमीत सिंग यांना स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तिथे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी गोळीबार केला. यात काही पोलीसही जखमी झाले आहेत. या गोंधळानंतर आमदार हरमीत सिंग यांनी पांढऱ्या एसयुव्हीमधून पळ काढल्याचा आरोप केला जात आहे.
पंजाबमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीबाबत आमदार हरमीत सिंग यांनी आम आदमी पक्षाची दिल्लीतील नेतृत्व आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव कृष्ण कुमार यांच्यावर टीका केल्यानंतर हे सर्व घडले आहे.
आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांच्या पूर्व पत्नीने सोमवारी रात्री पटियाला येथील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १२ फेब्रुवारी २०१४ ते १२ जून २०२४ या कालखंडात आमदारांनी गुन्हा केल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीनंतर एफआयआर दाखल झाला असून आमदार हरमीत सिंग यांच्यावर बलात्कार, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली भादंवि कलम ३७६, ४२० आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पठाणमाजरा यांनी आज सकाळी फेसबुकवर लाईव्ह येत आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्लीतील आपचे नेतृत्व पंजाबवर बेकायदेशीरपणे राज्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी याविरोधात आवाज उठवल्याबद्दल त्यांच्यावर आकसाने कारवाई होत आहे, असेही ते म्हणाले.
पठाणमाजरा यांच्या सहकाऱ्याने सांगितले की, त्यांना मंगळवारी सकाळी हरियाणातील कर्नाल येथील त्यांच्या नातेवाईकांच्या गावी अटक करण्यात आली. तर पोलिसांनी आरोप केला आहे की, रहिवाशांनी आमदारांना अटक करू देण्यास विरोध केल्यानंतर गोंधळाचा फायदा घेत ते एका एसयूव्ही गाडीतून पळून गेले. या गोंधळात गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यामुळे एक पोलीसही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान पठाणमाजरा यांचे वकील सिमरनजीत सिंग सग्गु यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “हरमीत सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने यासंबंधीचे प्रकरण निकाली काढले होते. मात्र दोन दिवसांपासून राज्यात चाललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सूड उगविण्यात येत आहे. तक्रारदाराने स्वतः कबूल केले होते की, ती हरमीत सिंग यांच्याबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. मात्र जाणुनबुजून बलात्काराचे कलम दाखल करण्यात आले आहे.