काँग्रेसला मोठा धक्का देत पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं सरकार स्थापन केलं. कधीकाळी स्टँडअप कॉमेडीमध्ये करिअर घडवू पाहणारे भगवंत मान यांच्या खांद्यावर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. शपथविधीनंतर अवघ्या महिन्याभरात एकामागोमाग निर्णय घेत भगवंत मान यांनी आपली निवड सार्थ ठरवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे पंजाब सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी भगवंत मान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील एक प्रमुख मंत्री विजय सिंगला यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या या निर्णयायची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

एक टक्का कमिशन!

विजय सिंगला यांच्याविरोधात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासमोर सक्षम पुरावे सादर झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागातील कामाची कंत्राटं वाटताना सिंगला एक टक्के कमिशन घेत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून ही कारवाई करण्यात आली. सिंगला यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर लगेचच त्यांना पंजाबच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने अटक केली.

देशाच्या इतिहासात दुसरीच घटना!

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे सिंगला यांच्याविरोधात १० दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. १० दिवसांत यासंदर्भात तपास करून सिंगला यांच्यावर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एखाद्या मुख्यमंत्र्याने आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्याविरोधात अशी कठोर कारवाई करण्याची ही देशाच्या इतिहासातली दुसरीच घटना ठरली आहे. याआधी आपच्याच सरकारमध्ये अशी घटना घडली होती. २०१५ साली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या एका मंत्र्याची अशा प्रकारे उचलबांगडी केली होती.

सिंगला यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याचा छडा लावण्यासाठी लागलीच मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेमध्ये संबंधित मंत्री आणि त्यांच्या सहाय्यकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सिंगला यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

भगवंत मान यांचा व्हिडीओ संदेश

हा प्रकार उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये भ्रष्टाचाऱ्यांना इशारा दिला आहे. “एक टक्का भ्रष्टाचार देखील सहन केला जाणार नाही. लोकांनी आपला मोठ्या आशेनं निवडून दिलं आहे. आपल्याला त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्याच लागतील. जोपर्यंत या पृथ्वीचे अरविंद केजरीवाल यांच्यासारखे पुत्र आणि भगवंत मान यांच्यासारखे सैनिक आहेत, तोपर्यंत भ्रष्टाचाराविरोधातील युद्ध सुरूच राहील”, असं मान यांनी या व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे.