Bhagwant Mann : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामना आयोजनावरून उलटसुलट चर्चा होत्या. अनेक चाहत्यांनी या सामन्यावर बहिष्कार घातला. या सामन्याची मैदानाबाहेर चांगलीच चर्चा झाली. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर तसेच बीसीसीआयवर या सामन्यावरून टीकाही झाली. मात्र, यानंतर अखेर भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेतील सामना दुबईत झाला.

दरम्यान, यावरून आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काही सवाल उपस्थित करत केंद्र सरकारला जाब विचारला आहे. ‘जर भारत-पाकिस्तान क्रिकेट चालतं तर मग कर्तारपूरच्या शीखांच्या धार्मिक यात्रेला विरोध का?’, असा सवाल मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं की, “जर पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणे स्वीकार्य असेल तर कर्तारपूरच्या शीखांच्या धार्मिक यात्रेला विरोध का? शीखांच्या धार्मिक यात्रेकरूंना कर्तारपूरला भेट देण्याची परवानगी का दिली जात नाही? ही आपल्या श्रद्धेची केंद्र आहेत. क्रिकेट किंवा व्यवसायाचं साधन नाही”, असं मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले.

भगवंत मान यांचे भाजपाला प्रश्न

भगवंत मान यांनी पंजाब भाजपा नेत्यांना विचारलं की सुनील जाखड आणि रवनीत सिंग बिट्टू हे या संदर्भात देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारतील का? त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तातडीने हस्तक्षेप करून यात्रेकरूंना पवित्र स्थळांना भेट देण्याची परवानगी देण्याची विनंती केली.