पीटीआय, नवी दिल्ली/चंडीगड/जम्मू
नवी दिल्ली, पंजाब आणि जम्मूत आलेल्या पुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. पंजाबमध्ये भाक्रा धरणाची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली असून प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. तसेच सतलज नदीजवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले.
भाक्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गुरुवारी सकाळी त्याची पाण्याची पातळी १,६७८.९७ फूट झाली. या धरणाची कमाल क्षमता १,६८० फूट होती. दरम्यान, व्यास नदीवरील पोंग धरणाची पाण्याची पातळी कमाल क्षमतेपेक्षा चार फूट झाली होती. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर संस्थांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सतलज, व्यास आणि रावी नद्या तसेच हंगामी लहान नद्या ओसंडून वाहत असल्याने पूरस्थिती उद्भवली आहे.
दिल्लीत यमुनेचा जलस्तर वाढला
नवी दिल्लीत काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे पाणी साचण्याच्या समस्येमुळे वाहतूक कोंडी झाली असतानाच यमुना नदीची पाण्याची पातळी वाढल्याने पूर आला आहे. शहरातील जुन्या रेल्वे पुलावरील यमुना नदीची पाण्याची पातळी २०७.४७ मीटरवर पोहोचली होती. पावसामुळे जवळपासचा परिसर आणि मदत शिबिरे पाण्याखाली गेली आहेत. मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि प्रमुख नोकरशहांची कार्यालये असलेल्या दिल्ली सचिवालयाजवळही पुराचे पाणी पोहोचले होते. मयूर विहार फेज एकसारखे काही सखल भागदेखील पाण्याखाली गेले असून मठ बाजार आणि यमुना बाजारसारखे क्षेत्र पाण्याखाली होते.
एनडीआरएफचे बचावकार्य
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) काही भागात बोटी वापरून तर काही भागात गुडघ्यापर्यंत पाण्यातून प्रवास करून पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना वाचवले. यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पूरग्रस्त मदत छावण्यांमध्ये अडकलेल्या लोकांचाही त्यात समावेश होता. यमुना बाजार आणि मयूर विहार फेज एकच्या काही भागातील लोकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. पुरामुळे त्यांना घरे सोडावी लागली आणि त्यांचे तंबू पाण्याखाली गेल्याने त्यांना सरकारी शाळांमध्ये आश्रय घ्यावा लागला.
आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीएसएफ चौक्यांचे नुकसान
पंजाब आणि जम्मूत आलेल्या पुरामुळे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील ११० कि.मी.पेक्षा जास्त परिसरातील कुंपणांची हानी झाली, तर ९० बीएसएफ चौक्या पाण्याखाली गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा २,२८९ किमी लांबीची असून राजस्थान आणि गुजरात राज्यांपर्यंत विस्तार आहे. बीएसएफ जम्मूमध्ये सुमारे १९२ किमी आणि पंजाबमध्ये ५५३ किमी अंतरावर तैनात असते. पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सुमारे ८० किमी लांबीचे कुंपण आणि जम्मूमध्ये सुमारे ३० किमी लांबीचे कुंपण पुरामुळे नष्ट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जम्मूमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) २० तर पंजाबमधील ६७ चौक्या पुराच्या पाण्यात बुडाल्या आहेत. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोन, मोठ्या सर्चलाइट्स आणि बोटींद्वारे गस्त घातली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.