येत्या २० फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमिंरदर सिंग यांनी २२ मतदारसंघांतून त्यांच्या ‘पंजाब लोक काँग्रेस’ पीएलसी या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार अजित पाल सिंग हे नकोदर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

 ‘जिंकण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करून आम्ही चांगले उमेदवार दिले असून, सर्व भागांना आणि समाजातील विविध घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व सुनिश्चित केले आहे’, असे अमिरदर सिंग यांनी सांगितले. ते स्वत: पतियाळा शहर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

 भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या पक्षांशी झालेल्या आघाडीचा भाग म्हणून पीएलसीला ११७ पैकी ३७ जागा देण्यात आल्या असून, पक्षासाठी आणखी ५ जागा सोडण्याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे, असे अमिरदर म्हणाले. पीएलसीच्या वाटय़ाला आलेल्या ३७ पैकी बहुतांश, म्हणजे २६ जागा राज्याच्या माळवा भागातील आहेत.

 दोआबमधून अजितपाल सिंग हे जालंधर जिल्ह्यातील नकोदर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैनात उतरणार आहेत. याच जिल्ह्यातील कँटॉनमेंट मतदारसंघात भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार व पंजाबचे मंत्री परगत सिंग हे विद्यमान आमदार आहेत.